
घाणीचे साम्राज्य दूर करण्याची मागणी करत ग्रामस्थांचे बीडीओ शिंदे यांना निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर आले असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने मात्र ग्रामसेवक व सरपंच दखल घेत नसल्याने घाणीचे साम्राज्य दूर करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी बीडीओ शिंदे यांचे दार ठोठावले आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना ग्रामस्थांनी दि 24 रोजी निवेदन दिले. या निवेदनात नमूद केले आहे की, गावातील न्यू प्लॉट भागात गटारी तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे गटारीचे पाणी, व सांडपाणी गल्लीत व घरासमोर पसरल्याने प्लॉट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, याबाबत तेथील रहिवासी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना सांगितले असता संबंधित अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे तसेच ग्रामपंचायतकडे निधी उपलब्ध नाही, निधी उपलब्ध झाल्यावर गटारी साफ सफाई केली जातील अशी उत्तरे दिली. या परिसरात डास, दुर्गंधी, दलदल युक्त परिस्थिती निर्माण झाली असून येणाऱ्या काळात पावसाळा सुरू होण्याआधी ही समस्या निराकरण करणे आवश्यक आहे कारण सांडपाणी व पावसाळ्यातील पाणी साचून ग्रामस्थाच्या आरोग्याची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे तक्रारीचा विचार करून समस्या सोडवावी अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिंदे यांना निवेदनातून ग्रामस्थांनी केली आहे. ही समस्या न सुटल्यास कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे. या निवेदनावर शांताराम कोळी, सुरेश कोळी,विलास कोळी, सुनील कोळी,ईश्वर कोळी,सुभाष कोळी यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.








