मित्रानेच पाळत ठेवून केला घात, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केली उकल…
अमळनेर:- अमळनेरकडे दुचाकीने जाणाऱ्या एका बांधकाम ठेकेदाराकडून भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांची लुट केल्याची खळबळजनक घटना दिनांक २३ मे रोजी दुपारी धरणगावपासून पाच कि.मी. अंतरावर म्हसले गावाजवळ घडली होती. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक करत अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
शहरातील ताडेपुरा भागातील बांधकाम व्यावसायिक व सध्या जळगाव येथे राहत असलेले बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी ( वय ३५) हे जळगाव येथून अमळनेर कडे येण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यांच्यासोबत एका व्यवहारासाठी नेत असलेली दोन लाखांची रोकड होती. धरणगाव ओलांडल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील सहा जणांनी त्यांना अडवले. काही कळण्याच्या आतच सूर्यवंशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाठीत चाकूने वार केले आणि त्यांच्याकडील दोन लाख रुपये व दुचाकी हिसकावून चोरटे अमळनेरच्या दिशेने पसार झाले होते.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोनपैकी एक संशयित आरोपी अविनाश देवेंद्र तायडे (वय २४) हा राजेंद्र सुर्यवंशी यांचा मित्रच असून त्याने सूर्यवंशी यांना बँकेतून दोन लाख रुपये रोकड काढताना पाहिले होते. सूर्यवंशी हे अमळनेरकडे निघाले असता अविनाश व त्यांच्या मित्रांनी त्यांचा पाठलाग सुरू करत म्हसलेजवळ गाठत लूट केली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत अविनाश तायडे व त्याचा साथीदार विशाल चंद्रकांत भालेराव (वय २०) यास अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्या दोघांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पीएसआय अनिल भुसारे व पोकॉ श्रीराम पाटील करीत आहेत.