अटल भूजल योजनेच्या माध्यमातून १६ कोटी लिटर पाणी जिरणार…
अमळनेर:- तालुक्यात अटल भूजल योजनेच्या माध्यमातून २३ गावात ४४९ रिचार्ज शाफ्टची कामे पूर्ण करण्यात आली असून त्याद्वारे यंदाच्या पावसाळ्यात अंदाजे १६ कोटी लिटर पाणी जिरणार आहे.
अटल भूजल योजनेअंतर्गत तालुक्यातील २७ ग्रामपंचायती व ३१ गावे समाविष्ट असून त्यापैकी २४ गावात या योजनेअंतर्गत ४५४ रिचार्ज शाफ्टची कामे प्रस्तावित होती. त्यापैकी २३ गावात ४४९ कामे ही पूर्ण झाली आहेत. या योजनेत बंधाऱ्यात किंवा नाल्यात १०० फूट बोअरवेल करून त्याच्या आजूबाजूला चौकोनी दीड ते दोन मीटर खड्डा खोदला जातो. यात सच्छिद्र पीव्हीसी पाइप टाकला जातो. तसेच बोअरचा पाइप सच्छिद्रच असतो. यात फिल्टर मीडिया वापरला जातो, जेणेकरून जलधरामध्ये दूषित किंवा गाळमिश्रित पाणी जाऊ नये. यामुळे पावसाळ्यात अधिकाधिक पाणी जमिनीत जाऊन मुरते, तर अधिकचे पाणी हे भूगर्भात वाहते राहते व भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेस जागतिक बँक व केंद्र सरकारने निधी दिला आहे. जिल्हा स्तरावर अटल भूजलच्या समितीचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असून प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळाल्यानंतर निधी मागणी व टेंडर काढून ही कामे पूर्ण करण्यात येत असून १८ ठेकेदारांच्या माध्यमातून ही कामे पूर्णत्वास आली आहेत. तालुक्यात सर्वप्रथम मारवड विकास मंचाच्या माध्यमातून गावपरिसरात रिचार्ज शाफ्टची कामे करण्यात आली होती व त्याचे मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम ही दिसून आले होते. आता या योजनेच्या संपूर्ण तालुक्याची भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही ४४९ रिचार्ज शाफ्टची कामे पूर्णत्वास आल्यानंतर नवीन प्रस्तावित कामांना ही मंजुरी मिळाली असून लवकरच ३० जून पूर्वी अमळनेर तालुक्यात अजून रिचार्ज शाफ्ट व रिचार्ज स्ट्रेंचची कामे करण्यात येणार असल्याची माहिती भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन पी. दहिकर यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया
पावसाळ्यात नाल्यास दोन वेळा पाणी आल्यास एका रिचार्ज शाफ्टमधून अंदाजे ३ ते ४ लाख लिटर पाणी जिरते. अमळनेर तालुक्यात ४४९ रिचार्ज शाफ्टच्या माध्यमातून अंदाजे १५ ते १६ कोटी लिटर पाणी जिरेल असा अंदाज आहे.
:- विक्रांत ठाकूर, कनिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जळगाव