मौजमस्ती करण्याच्या नादात अलगद अडकला अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात…
अमळनेर:- नाशिकच्या पंचवटीतील सप्तशृंगी मंदिरातील पादुका चोरी करून लपून बसण्याच्या उद्देशाने अमळनेरात मजुरी करणाऱ्या एकास अमळनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरातील सप्तशृंगी मंदिरात राञी चोरट्यांनी चोरी उद्देशाने मंदिरात शिरून २६ मे रोजी पादुका चोरी केल्या. आपले गैरकृत्य बाहेर येवु नये व पोलीसांनी पकडु नये या उद्देशानेच चोरट्याने त्याच दिवशी कुणालाही कळण्याआधीच नाशिक शहर सोडून देऊन अमळनेरात येऊन मजुरीवर कामास जावु लागला. तिकडे पंचवटी पोलीस स्टेशनला भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर चोरीमध्ये लोकांच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्याने नाशिक पोलीस देखील सदर आरोपींच्या शोधात असतांना चोरटा हा घरातील फरशी बसविण्याच्या कामात निष्णात असल्याने त्याने शहरातील फरशी बसवणारे ठेकेदार यांच्याकडे कामास रोजंदारीवर काम करु लागला. परंतु अमळनेर पोलीस मागील काही महीन्यापासुन शहरातील गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवुन असल्याने अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना खबर मिळाली की, शहरातील विश्वकर्मा मंदिराशेजारी मजुरी कामासाठी नाशिक येथील किशोर चव्हाण नामक अट्टल चोरटा हा नाशिक शहरात पंचवटी परिसरातील सप्तशृंगी मंदिरात चोरी करून अमळनेर शहरात लपून बसला असून तो रोज विदेशी दारु पिऊन मौजमस्ती करत आहे अशी बातमी मिळाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भटुसिंग तोमर, मिलिंद भामरे,सुनील हटकर, कपिल पाटील, जितेंद्र निकुंभे यांना सदर इसमाचा शोध घेऊन ताब्यात घेण्यास सांगीतल्यावर सदर पोलीस पथकाने दि ३१ मे रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास खात्री झाल्यावर त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले व विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने नाशिक येथील सप्तशृंगी मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. सदर चोरटा अमळनेर पोलिसाच्या ताब्यातून घेऊन जाण्याबाबत नाशिक पोलीसांशी संपर्क साधून त्यास ताब्यात देण्यात आले आहे.