अमळनेर पोलीस स्टेशनच्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल केला सन्मान…
अमळनेर:- गेल्या सहा महिन्यापासून अमळनेर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी चार्ज घेतल्यापासून अमळनेर पोलीस स्टेशनच्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल संपूर्ण अमळनेर साक्षी आहे. अशा कामगिरीचा गौरव होणे हे अगत्याचे असल्याने मंगळग्रह मंदिरात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांचा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार शिरीच चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, मंगळ मंदिर सेवा संस्थाचे अध्यक्ष डिगंबर महाले आदी मान्यवर उपस्थित होते.
तेच पोलीस स्टेशन, तोच स्टाफ, पण पो.नि. विजय शिंदे यांचे कामाचे नियोजन व त्यातील कौशल्य आणि कर्तव्याप्रती शुद्ध निष्ठा यामुळे तेव्हापासून आजपावेतो खाकीच्या कर्तृत्वाने अमळनेर मध्ये आलेख उंचावतच नेला आहे. अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएच्या कठोर कारवाया, अनेक मोठमोठे अवघड गुन्हे उघडकीस आणणे, पेट्रोल पंपच्या दरोडेखोरांना पकडणे, महिलांच्या सोनसाखळी चोरांना पकडून त्यांना भर चौकात खाकीची दहशत दाखवणे, महिलांची छेड काढणाऱ्यांना पकडल्यावर चौकीतून वाजलेल्या फटाक्यांचे आवाज, यामुळे बऱ्याच गुन्हेगारांनी तर अमळनेर सोडून पळ काढला आहे. तर काही गुन्हेगारी सोडून कामाधंद्याला लागले आहेत. या सर्वांमुळे गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांची ओळख झाली आहे.
परंतु तरी देखील त्यांच्या साधेपणामुळे व संवेदनशीलतेमुळे सामान्य जनतेला ते आपलेसे वाटतात. गरीबातला गरीब व्यक्ती असला तरी त्याला साहेबांची भेट घ्यायला कोणा मध्यस्थीची गरज लागत नाही. या त्यांच्या कार्याचा अमळनेरकरांनी तर त्यांचा यापूर्वीच गौरव करून दखल घेतलीच आहे, त्यांच्या वरिष्ठांनी पण त्यांना व त्यांच्या टिमला प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित केलेले आहे. काल महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार केला आहे.