अमळनेर पोलिसांनी घेतले आरोपीला ताब्यात…
अमळनेर:- हरवलेल्या किसान कार्ड चा वापर करून अज्ञात आरोपीने आयसीआय सी आय बँकेच्या एटीएम मधून ५१ हजार ७०० रुपये लंपास केल्याची घटना २६ ते २९ मे दरम्यान घडली होती याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सविता प्रल्हाद पाटील रा साईबाबा मंदिराजवळ पैलाड अमळनेर यांचे जानवे जेडीसीसी बँकेचे किसान क्रेडिट कार्ड त्यावरच पिन कोड लिहिलेले २६ रोजी हरवले. ३० तारखेला ते बँकेत कार्ड बंद करून पैसे काढायला गेले असता त्यांना बँकेच्या मॅनेजरने सांगितले की तुमच्या कार्ड वरून वेगवेगळ्या वेळी आणि तारखेला सुमारे ५१ हजार ७०० रुपये आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मधून काढले गेले आहेत. महिलेला आपली रक्कम चोरी झाल्याचे लक्षात येताच अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत आरोपीस शोधण्यासाठी काम सुरू केले होते. पो. नि. विजय शिंदे यांना माहिती मिळाली की, ते पैसे तालुक्यातील दरेगाव येथील प्रकाश कृष्णा पाटील याने काढले आहेत. त्यावरून पोलिस पथकाने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने पैसे काढल्याची कबुली दिली. त्यास अटक करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.