शहरातील राजमुद्रा मेडिकलवर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचा छापा…
अमळनेर:- नशेसाठी व गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व औषधी विना परवाना बाळगणाऱ्या राजमुद्रा मेडिकलवर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे. सदर मेडिकल दुकान मालक त्यानंतर फरार झाला आहे.
अमळनेर शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या दुकान नंबर ५ मध्ये सूरज अधिकार पाटील यांचे राजमुद्रा मेडिकल दुकान सुरू असून तेथे ५ एप्रिल २०२३ ते ११ जुलै २०२३ दरम्यान मोठ्या प्रमाणावर नशा येणाऱ्या औषधी साठा केला असल्याचे तपासणी अहवालात आढळून आले. कोडिन सिरप ५५९ बाटल्या, ट्रॅमाडीन १०० इंजेक्शन, निट्रोसून ४५३० गोळ्या खरेदी केल्या असल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळ्या नशेसाठी वापरण्यात आल्या असल्याचे दिसून आल्याने अन्न व औषध निरीक्षक सोमनाथ बाबासाहेब मुळे, सहआयुक्त अनिल माणिकराव, औषध निरीक्षक गजानन धिरके यांनी १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राजमुद्रा मेडिकलवर छापा टाकला असता अल्प्रासेफ नावाच्या २२० गोळ्या दिसून आल्या. या गोळ्या नशेसाठी वापरण्यात येतात. आणि या गोळ्यांना नशा करणाऱ्यांमध्ये ‛कुत्ता’ गोळ्या म्हणून ओळखल्या जातात. या गोळ्या भंगाळे डिस्ट्रिब्युटर यांच्याकडून घेतल्याचे दिसून आले. दुकानदार सूरज अधिकार पाटील याने गोळ्यांची विक्री अथवा वापर बाबत काहीच पुरावे दिले नाहीत. मात्र त्याने चतुर नावाच्या विक्री प्रतिनिधी कडून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे या गोळ्या अवैधरित्या गर्भपातासाठी वापरण्यात आल्या असाव्यात. म्हणून सोमनाथ मुळे यांच्या फिर्यादीवरून सुरज आणि चतुर यांच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम २२ प्रमाणे आणि भादवि ३२८ ,२७६ ,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे व हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.