पिंपळी प्र.ज. येथे फांदी पडून वृद्धेचा मृत्यू, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली…
अमळनेर:- मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सुमारे एक तास झालेल्या वादळामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली व विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला होता.
४ जून रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अचानक काळ्या ढगांनी आभाळ भरून आल्याने भर दुपारीच संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण झाले होते. अचानक जोरदार वारा सुटून शहरासह तालुक्यात झाडे उन्मळून पडली. तसेच अनेक गावात पत्रे उडाल्याने घरांचे नुकसान झाले. तालुक्यातील पिंपळी प्र.ज. येथे सुंदरबाई तुकडू बाविस्कर (वय 87 वर्षे) यांच्या अंगावर झाडाची फांदी पडल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. तलाठी स्वप्निल कुळकर्णी यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच प्रेमराज चव्हाण, ग्रामसेवक विवेक सुर्यवंशी, पोलीस पाटील मिना महाजन व ग्रामस्थ उपस्थित होते. धार ते धानोरा फाट्यादरम्यान झाड पडल्याने एका बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच शहरातील त्रिकोणी बगीचा, एल आय सी कॉलनी, धुळे रोड चर्च जवळ, मुंदडा नगर याठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले होते. तसेच नाट्यगृहासमोर झाड पडून वीज तारा ही तुटून पडल्या होत्या. तालुक्यात उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. पालिका कर्मचारी, वीज कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लग्न समारंभ होते. मात्र वादळी पावसामुळे वऱ्हाडीसह वधू व वर पक्षाची मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली. वाऱ्यामुळे मंडपाचे देखील नुकसान झाले असून ऐनवेळी लग्नाचे ठिकाण बदलवावे लागले. ज्या शेतकऱ्यांनी शेतात ठिबकच्या नळ्या अंथरल्या होत्या, त्या वाऱ्यामुळे गोळा झाल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. तसेच काही ठिकाणी ठिबकचे ही नुकसान झाले आहे. तालुक्यातील वासरे येथे बैलाच्या अंगावर झाड पडल्याने बैलाच्या पाठीचे हाड मोडले असून बैल गंभीर जखमी झाला असून बैलगाडीचे ही नुकसान झाले आहे. पातोंडा येथे रुग्णवाहिकेवर झाड पडून नुकसान झाले. पातोंडा येथील शेतकरी संगिता खेमराज बोरसे यांच्या शेतातील सौर कृषी पंपाचे प्लेट्स ४० ते ५० फूट अंतरावर उडून गेल्याने सदर सौर पंपाच्या प्लेट्स फुटून नुकसान झाले आहे. मुंगसे ,जैतपिर, कळमसरे याठिकाणीही अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.