महिला संरक्षण अधिकारी व इतरांनी घरातून सोडवत रुग्णालयात केले दाखल…
अमळनेर:- शहरातील तांबेपुरा मारुती मंदिरा शेजारील एका इसमाने त्याच्या पत्नीला जबर मारहाण करून घरातच
तीन चार दिवसापासून डांबून ठेवले होते. महिला संरक्षण अधिकारी आणि अन्य दोन महिलांनी तिची सुटका करत बेशुद्ध महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, प्रथमोपचार करून तिला धुळे येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तांबेपुरा भागातील मारुती मंदिराशेजारील एका इसमाने पत्नीला जबर मारहाण करून घरात कैद केल्याची माहिती महिला संरक्षण अधिकारी योगिता चौधरी यांना अज्ञात व्यक्तीने दिली त्यावरून चौधरी यांनी तात्काळ आधार समुपदेशन केंद्रातील रेणुप्रसाद व त्यांचे दोन सहकारी ज्ञानेश्वरी पाटील व मोहिनी पाटील यांची मदत घेऊन सदर ठिकाण गाठलं, त्या घरात सदर महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती, त्यांनी तिला तात्काळ खाजगी वाहनाने प्रथमोपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आले व त्यांनतर तिच्या नातेवाईकांना कळविण्यात आले, पोलिसांना कळवून त्यानंतर त्यांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. परंतु महिलेची स्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारासाठी तिला तात्काळ धुळे येथे ॲम्बुलन्सने रवाना केले. दरम्यान पत्नीवर अशा पद्धतीने जबर मारहाण करणाऱ्या नवऱ्यावर महिला संघटनेने पुढे येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी होत आहे.