जास्तीचे पैसे मागितल्यास तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन…
अमळनेर:- विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांकडून विद्यार्थी व पालकांची लूट केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला असून विद्यार्थ्यांनी ठरलेल्या दराप्रमाणेच पैसे द्यावेत अन्यथा तहसील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी केले आहे.
दहावी बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर, उत्पन्नाचा दाखला, सेंट्रल कास्ट, डोमीसाईल सर्टिफिकेट आदी प्रकारचे दाखले काढण्यासाठी गर्दी करत आहेत. विविध ठिकाणी प्रवेश, नोकरी अर्जासाठी, मुलाखतीसाठी लवकर दाखले मिळण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची तळमळ सुरू असल्याने त्याचा गैरफायदा घेत सेतू केंद्र चालक किमान ३६ रुपये फी असताना विद्यार्थ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये घेत आहेत. दोन पालकांनी तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. सेतू केंद्र चालकांनी त्यांच्या केंद्रावर प्रत्येक दाखल्यासाठी लागणारी फीचे दरपत्रक बाहेर लावणे आवश्यक आहे. तसेच तहसील कार्यालयात देखील माहितीसाठी प्रत्येक दाखल्याचे दर जाहीर करण्यात येतील. मात्र विद्यार्थ्यांनी कोणत्याही सेतू चालकाला जादा पैसे देऊ नयेत, सेतू केंद्र चालकाने जादा पैसे मागितल्यास अथवा दाखल्याची कागदपत्रे न स्वीकारल्यास तहसील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन निवासी नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी केले आहे.