वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडले नैसर्गिक अधिवासात…
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथे विहिरीत पडलेल्या दोन हरणांना ग्रामस्थांनी बाहेर काढत जीवनदान दिले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले.
अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथील शेतकरी विलास नथ्थु पाटील यांच्या लोण पंचम शिवारातील विहिरीत दोन हरीण पडल्याची माहिती ग्रामस्थांना शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याने दिली. त्याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेत खाटेच्या सहाय्याने दोन्ही हरणांना बाहेर काढले व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वनपाल पी जे सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे यांनी भेट देत एका हरणाला तोंडाला व पायाला मार लागल्याने पशू वैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील यांना बोलवून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी शशीकांत पाटील, विनायक पाटील, सागर पाटील, चेतन पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.