संपूर्ण शहरात विविध पथकांसह एकूण ५०० कर्मचारी आहेत तैनात…
अमळनेर:- शहरातील जनता सुरक्षित रहावी आणि गर्दीचा गैरफायदा घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या बंदला काल संमिश्र प्रतिसाद मिळाला.
दंगलीतील आरोपी अशपाक सलीम शेख उर्फ पक्या याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर शहरात १४ रोजी सायंकाळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पटापट दुकाने बंद होऊन नागरिकांचीही पळापळ सुरू झाली होती. त्या अनुषंगाने १५ रोजी स्वयंस्फूर्तीने अमळनेर बंदचा निर्णय घेण्यात आला होता. शहरातील सराफ बाजार, पानखिडकी, दगडी दरवाजा, मोठी बाजारपेठ, पाच कंदील चौक, सुभाष चौक, गांधलीपुरा आदी भागात ८० टक्के दुकाने बंद तर मोजकी दुकाने सुरू होती. तर शहराच्या भाजीपाला मार्केट, लालबाग, बसस्टँड, मंगलमूर्ती चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मात्र सर्व दुकाने खुली होती.
पोलिसांनी शहराच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली असून दोन दिवसांपासून अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावळे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक कावेरी कामदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी आदी अधिकारी ठाण मांडून होते. शहरात २५ अधिकाऱ्यांसह ५ आरसीपी पथक, ४ एसआरपी पथक,१ क्यूआरटी पथक असे एकूण ५०० कर्मचारी संपूर्ण शहरात तैनात करण्यात आले आहेत.