स्वतःच्या गाडीतून नेत प्राण वाचवून घडविले माणुसकीचे दर्शन…
अमळनेर:- मंदिरावरून दर्शन घेऊन परत येताना रस्त्यावर अस्वस्थ झालेल्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या गाडीत नेऊन दवाखान्यात दाखल करत त्याचे प्राण वाचवून डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
पाच ते सहा दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीबाबत सतर्कता बाळगत डीवायएसपी सुनील नंदवाळकर आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरात गस्त घालत होते. गस्त घालताना मंगळ मंदिरावर भेट दिली. तिकडून देवाचे दर्शन घेऊन परत येत असताना त्यांना नितीन साळुंखे यांनी रस्त्यावरच एक माणूस तडफडत असल्याचे सांगितले. येणारे जाणारे कोणीतरी दारू पिऊन पडला असावा म्हणून बघून निघून जात होते. मात्र नंदवाळकर याना संशय आला त्यांनी १०८ ला कॉल करून वेळ वाया घालवण्यापेक्षा ताबडतोब पडलेल्या इसमाला उचलून स्वतःच्या गाडीत टाकले. आणि ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तो इसम बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. बेशुद्धावस्थेत त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. तो वसंतनगर ता. पारोळा येथील असल्याचे समजले असून त्याच्या खिश्यात ईश्वर जाधव नावाची चिट्ठी होती. डीवायएसपी सुनील नंदवाळकर व त्यांचे सहकारी कर्मचारी पोलीस नाईक भटूसिंग तोमर, संजय बोरसे, गणेश पाटील, नितीन साळुंखे यांचे कौतुक होत आहे.