अप्पर पोलीस महासंचालकांचे आदेश, अमळनेर पोलिस ठाण्यात काल तपासणी..
अमळनेर:- येथील दंगल प्रकरणातील संशयित आरोपी अशपाक सलीम शेख उर्फ पक्या याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता सीआयडीला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. काल अमळनेर पोलीस ठाण्यात पथकाने चौकशी केली.
अशपाक याच्या मृत्यूबाबत शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षकांकडे सीआयडी चौकशीची मागणी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी नाशिक विभाग सीआयडी पथकाला चौकशी आदेश दिले असून नाशिक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच डीवायएसपी मोरे, कर्मचारी रेड्डी यांनी गुरुवारी अमळनेर पोलीस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतली. तर जळगाव विभागाच्या पोलीस निरीक्षक पूनम केदार व दोन अंमलदार यांनी शुक्रवारी अमळनेर पोलीस स्टेशनला आरोपी अटक केल्यापासून तर आरोपीला जळगाव नेईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीना पोलीस कोठडीत मारहाण झाली होती का ? याबाबत बारकाईने तपासणी करण्यात आली. अशपाक याला प्रकृती अस्वस्थ व विचित्र बडबड प्रकरणी १२ रोजी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते. तर १४ रोजी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे जळगावहून अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनतर न्यायालयाने आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आरोपीचा त्याच दिवशी सायंकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर न्यायाधीशांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले होते. आता सीआयडी चौकशी दरम्यान काय पुढे येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.