रा.काँ.च्या नेत्यांचा रोड शो, राज्यभरातून १५०० प्रतिनिधी राहणार उपस्थित…
अमळनेर:-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शुक्रवारी (ता. १६) अमळनेर येथे रोड शो होणार आहे, तसेच ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशनही होणार आहेत. राज्यभरातून तब्बल १५०० प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून आपल्या नेत्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.
अमळनेर येथे ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय अधिवेशनाचा प्रारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते होईल.राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, लेखक रावसाहेब कसबे,विजय चोरमारे आदी उपस्थित राहतील.राज्यातील नऊ ग्रंथालयांना शरदचंद्र पवार उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. अधिवेशनाचा समारोप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येईल.
विरोधी पक्ष नेते अजित पवार रात्रीच मिडटाउन हॉटेल मध्ये मुक्कामी थांबणार आहेत. सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी अजित पवार आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर शरद पवार व अजित पवार, जयंत पाटील आदी नेत्यांचा स्थानिक कार्यकर्ते रोड शो करून शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आमदारांच्या निवासस्थानापासून, महाराणा प्रताप चौक, मंगलमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शिबिरस्थळी जातील. राष्ट्रवादी ग्रंथालय कार्यकर्त्यांच्या शिबिराचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते होईल. जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. अजित पवार शिबिराचा समारोप करतील. ग्रंथालय सेलच्या अधिवेशनाचा समारोप झाल्यावर अमळनेर येथील प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणाऱ्या वादग्रस्त जागेस भेट देणार आहेत. त्यांनतर शरद पवार यांची पत्रकार परिषद दुपारी १ वाजता आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी होईल. त्यानंतर जळगावकडे रवाना होतील. दुपारी अजित पवार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील नेत्यांशी लोकसभा व आगामी निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.