इंदापिंप्रीच्या पोलीस पाटलांच्या उपक्रमाने होणार १० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा…
अमळनेर:- सेवानिवृत्तीबद्दल आम्हाला जेवण देण्यापेक्षा गावाच्या पाण्यासाठी काहीतरी कर असे डीवायएसपींनी सांगताच इंदापिंप्रीच्या पोलीस पाटलाने नाला खोलीकरण सुरू केले आहे. पोलीस पाटलाच्या या निर्णयाने १० दशलक्ष घनमीटर पाणी साठा होऊन ५० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.
अमळनेर तालुक्यातील इंदापिंप्री येथील पोलीस पाटील भानुदास पाटील हे सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीबद्दल सहकारी आणि पोलीस खात्याला तिखट जेवणाचा बेत आखण्यात आला. पोलीस पाटील डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना आमंत्रण द्यायला गेले आणि डीवायएसपीनी बेतच बदलवला. “अरे बाबा आम्हाला जेवण देऊन वायफळ खर्च करण्यापेक्षा तुझ्या गावात नदी,नाला खोलीकरण कर. नदी नाला नांगरून घे. त्यामुळे टंचाई दूर होऊन शेतीसाठी सिंचन वाढेल” अशी सूचना डीवायएसपींनी केली व ती पोलीस पाटलाला आवडली आणि त्यांनी तिखट जेवणाचा बेत रद्द केला. तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला आणि गावाबाहेर नाला खोलीकरण, माती बांधचे काम हाती घेतले. आणि अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून शनी अमावस्येला नाला खोलीकरणाचा शुभारंभ डीवायएसपी नंदवाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. इंदापिंप्री येथे दोन वर्षांपूर्वी टँकर लागत होते. येथील खोलीकरण मुळे सुमारे १० दशलक्ष पाणी साठा वाढणार असून सिंचन क्षमताही वाढेल त्यामुळे ५० हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. शुभारंभ प्रसंगी नंदवाळकर आणि तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी लोकसहभागाचे आवाहन करताच धनराज गंगाराम पाटील या शेतकऱ्याने देखील स्वतःहून नाला नांगरण्याचे जाहीर केले. यावेळी सरपंच रवींद्र भिल, उपसरपंच शोभाबाई पाटील, कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार, कृषी सहाय्यक सुप्रिया पाटील, किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.