मराठा समाज महिला मंडळाच्या १०५ सदस्यांनी एकत्र धुळे येथे जात घेतला सिनेमाचा आनंद…
अमळनेर:- “बाईपण भारी देवा” या मराठी सिनेमाने संपुर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालून महिलांना चांगलेच आकर्षित केले असताना अमळनेर मराठा समाज महिला मंडळाच्या सुमारे 105 महिला सदस्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसने एकत्रितपणे धुळ्यातील थिएटरमध्ये जाऊन सिनेमाचा आनंद घेतला.
या सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळाच उत्साह आणि वेगळीच ऊर्जा महिला भगिनींमध्ये संचारल्याचे दिसून आले.सदर ऊर्जा देण्याच्या मानकरी अमळनेर येथील उद्योजिका राजश्री कल्याण पाटील ह्या ठरल्या. कारण महिलांना प्रेरणा देणारा आणि त्यांच्या वास्तविक जीवनाचे सत्य कथन करणारा हा सिनेमा असल्याने त्यांच्या संकल्पनेतून आणि योगदानातूनच हा उपक्रम पार पडला. सुरवातीला राजश्री पाटील यांनी ही संकल्पना मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी चांगला उपक्रम म्हणून हिरवा कंदील दिला,यामुळे लागलीच त्यांनी संपूर्ण नियोजन केले. धुळे येथील ज्योती सिनेमा थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होत असल्याने तेथे जाण्यासाठी अमळनेर आगार प्रमुखांशी बोलून दोन बसेसची व्यवस्था त्यांनी केली होती,105 महिलांची नोंदणी झाल्यानंतर सिनेमाचे ऍडव्हान्स बाल्कनीचे बुकिंग राजश्री पाटील यांनीच केले.अखेर रविवार 13 जुलै रोजीचा दिवस निश्चित होऊन सकाळी 11 वाजता या सर्व महिला अतिशय आनंदाने धुळे येथे पोहोचल्या विशेष म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या सौभाग्यवती जयश्री अनिल पाटील तसेच त्यांच्याच कुटुंबातील श्रीमती राजश्री पाटील, तिलोत्तमा पाटील सुलोचना वाघ, राजश्री पाटील याही महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी सोबत असल्याने महिलांचा आनंद द्विगुणित झाला होता. संत सखाराम महाराजांचा जयघोष करीत बस धुळ्याकडे रवाना झाली,बसमध्ये अर्धतिकीट योजनेचाही महिलांना लाभ मिळाला. तसेच बसमध्ये वाहकही महिला असल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. वाटेत मिमिक्री,गाणे यासह विविध कलाविष्कार सादर करीत बस धुळ्यात पोहोचली.तेथे थिएटरमध्ये सर्वांनी एकत्रित सिनेमाचा आनंद घेतला तत्पूर्वी प्रत्येकाने डोळ्यावर गॉगल चढवून फोटोसेशन चा आनंद घेतला.त्यानंतर परतीचा प्रवास सुरु झाला.परत येताना पुन्हा तेवढीच धम्माल महिलांनी केली.
या सिनेमाच्या निमित्ताने सर्वच वयोगटातील महिला सहभागी झाल्या होत्या,विशेष म्हणजे काही जेष्ठ महिला ज्या कधीही थिएटरमध्ये पोहोचल्या नाहीत त्या देखील आल्याने त्यांनी आनंददायी भावना व्यक्त करत आयोजक असलेल्या राजश्री पाटील यांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले.तर यानिमित्ताने सामाजिक एकत्रिकरण झाल्याचे अनेक महिलांनी सांगत आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण ठरल्याचे त्यांनी सांगितले.
सदर उपक्रमाच्या आयोजक राजश्री पाटील यांनी सांगितले की “बाई पण भारी देवा” हा सिनेमा महिला वर्गाचा उत्साह वाढविणारा आणि त्यांना स्वावलंबनाची प्रेरणा देणारा असल्याने अमळनेर येथील माझ्या माता भगिनींना ही प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम आम्ही राबविला यासाठी मराठा समाज महिला मंडळाच्या सर्वच भगिनींनी अनमोल अशी साथ दिली, यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आमच्यासाठी समाधानकारक होता. जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील,श्रीमती राजश्री पाटील, सुलोचना वाघ, पदमजा पाटील, रागिणी महाले, भारती पाटील,प्रा शिला पाटील या सर्वानी अनमोल सहकार्य केले,एस टी महामंडळाचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले.