उपस्थितांनी मदत करत बाळ व बाळंतिणीला केले दवाखान्यात रवाना…
अमळनेर:- शहरातील तिरंगा चौकात रस्त्यावरच महिलेची प्रसूती झाली, यावेळी उपस्थितांनी या गरीब महिलेला मदत करत दवाखान्यात रवाना केले.
काल सकाळी साडे सहा वाजता महाजन रेस्टॉरंट समोरच ही महिला प्रसूत झाली. रक्तबंबाळ स्थितीत ती पडलेली असताना काय करावे हे सुचत नव्हते. त्यावेळी महाजन रेस्टॉरंटचे मालक भाऊसाहेब महाजन यांनी रिक्षा बोलावली, पैसे ही देऊ केले. मात्र रक्ताने रिक्षा भरेल म्हणून कोणीही रिक्षा थांबविली नाही. महाजन यांनी 108 ला कॉल केला तो पर्यंत बघ्यांची गर्दी झाली. मात्र कोणीही मदत करत नव्हते, अश्यावेळी “आपली आंडेर बेटी राहथी, ते आपण असा दूर उभा राहतुत का ?” असे म्हणत एका अनोळखी महिलेने पुढे येते मदत केली, तर बापू आप्पा बिऱ्हाडे, किरन बागुल, यांनी चादर आणली त्यात नवजात बालकाला गुंडाळले. तो पर्यंत 108 आली, त्या महिलेच्या पतीला दवाखान्यात जायला सांगितले तेंव्हा त्याने पैसे नसल्याचे सांगितले,भाऊसाहेब महाजन यांनी स्वतः शंभर रुपये मदत करताच उपस्थितांनी कुणी पन्नास तर कुणी 10 तर 20 रुपये मदत केली. ते सर्व पैसे नवजात बाळ आणि बाळंतिणीला देत त्यांना दवाखान्यात रवाना केले. सदर महिला शहरात मजुरी करत मागून खात गुजराण करते. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात बाळ व बाळंतिणी सुरक्षित उपचार घेत आहेत.