कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे जपान येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत झाली निवड…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील चि. जयेश साळुंखे याने दैदिप्यमान यश मिळवीत मारवड गावातून पहिला आयआयटीयन बनण्याचा मान मिळवला आहे. तसेच त्याची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे जपान येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे.
तालुक्यातील मारवड येथील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या जयेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण साकेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तो पुण्यात होता. त्याने मेहनतीच्या जोरावर 2018 मध्ये आयआयटी गांधीनगर गाठले. मारवड गाव व परिसरातील तरुणाने आयआयटी ह्या उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्याच्या आई-वडील आणि कुटुंबियांना तो सुखद धक्काच होता.आयआयटी, गांधीनगर येथून बी टेक इन कॉम्प्युटर सायन्स आणि बी टेक इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग अशी दुहेरी डिग्री संपादन केली. दि. 29 जुलै 2023 रोजी झालेल्या पदवी प्रदान समारोहात त्याला पदवी देवून भूषविण्यात आले. चि. जयेशचे वडील ज्ञानेश्वर साळुंखे हे अमळनेर व मारवड येथे स्पर्धा परीक्षा गणित व विज्ञान या विषयांचे कोचिंग क्लासेस चालवतात व आई मनीषा ह्या गृहिणी आहेत. त्याला दिवंगत काका डॉ पी. एन. पाटील यांचेही त्याला सतत प्रोत्साहन मिळत होते. त्याची कॅम्पस इंटरव्ह्यू मधून जपानच्या राकुटेन मोबाईल या मल्टीनॅशनल कंपनीत निवड झाली आहे. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच तो नोकरीसाठी जपान येथे रवाना होणार आहे.