एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह होतोय साजरा…
अमळनेर:- एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून या कालावधीत तलाठी कोतवाल सैनिकांच्या घरोघरी जाऊन समस्या जाणून त्यांचे निराकरण करतील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली. खेडकर यांच्या हस्ते तहसील कार्यालयात महसूल कक्ष स्थापन करण्यात आला.
लोकाभिमुख प्रशासनासाठी ई हक्क प्रणाली भविष्यात लाभदायक ठरणार आहे. ई हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन, प्रचार व प्रसिद्धीकरिता नागरिक मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याअंतर्गत ई करार बोजा दाखल करणे, गहाणखत बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयतांचे नाव कमी करणे, अज्ञान पालक कर्ता कमी करणे, एकत्र कुटुंब कर्ता कमी करणे, विश्वस्त नाव बदलणे, संगणकीकृत सात बारा, हस्तलिखित सात बारा चूक दुरुस्ती या नऊ प्रकारच्या फेरफारसाठी खातेदारांना पीडीई (पब्लिक डेटा एन्ट्री) च्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यामुळे तलाठीना भेटण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज आल्याने तलाठीना त्यावर मुदतीत निर्णय घेणे भाग राहील जनतेची सोय होणार आहे. त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून सैनिकांची यादी मागवून तलाठी आणि कोतवाल यांच्या मार्फत घरोघरी जाऊन ‛सैनिक हो तुमच्यासाठी’ ही योजना राबवून महसूल बाबतच्या समस्या सोडवल्या जातील. युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद असे कार्यक्रम सात दिवस राबविण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी महसूल दिनी महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या १० वी व १२ वीच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.