शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील आमोदे येथील ३६ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतात विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ४ रोजी दुपारी घडली आहे.
कैलास भालेराव पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. कैलास याच्याकडे २ बीघे शेती असून शेतात कपाशी लागवड केली आहे, कपाशी पाहण्यासाठी ते शेतात गेले असता शेतातील विद्युत खांब्याच्या ताण दिलेल्या तारेत करंट उतरले होते. त्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. त्यांचा चुलत भाऊ शेतात गेला असता सदर प्रकार उघडकीस आला. जितेंद्र अमृत पाटील यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कैलास पाटील यांच्या पश्चात दोन लहान मुले,पत्नी असा परिवार आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याने त्यांच्या गुन्हा दाखल करून शेतकऱ्याच्या परिवाराला आर्थिक मदत करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.