गायींची गोशाळेत रवानगी, दोघांवर पोलिसांत गुन्हा…
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे गावाजवळ गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणारे वाहन ग्रामस्थांनी पकडत गायींची सुटका करत पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पाडसे येथे क्रमांक एमएच ४० सीडी ८५०७ या आयशर गाडीतून गुरांचा आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी गाडी थांबविली व पोलिसांना पाचारण केले. मारवड पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ पोहचत तपासणी केली असता वाहनात दहा गायींना निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आले होते. चालक मुनावर खान (राजगड, मध्य प्रदेश) व त्याचा सोबती मेहबूब पठाण (श्रीरामपूर, अहमदनगर) यास ताब्यात घेतले असता त्यांनी गुरे हि मध्य प्रदेशातील सिहोर येथून चाळीसगाव येथे शनिवारच्या बाजारासाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र अंदाजे २४ तासांपेक्षा जास्त कालावधीपासून गायी ह्या विना चारापाण्याच्या बांधून नेत असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. मारवड पोलीसात पोकॉ अनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पशु क्रूरता अधिनियम, प्राण्याचे परिवहन नियम अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन निकम हे करीत आहेत. या गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे. सदरची कारवाई हवालदार सुनील अगोने, हवालदार फिरोज बागवान, पोलीस नाईक सुनील तेली, मुकेश साळुंखे यांनी केली आहे.