एक वासरू ठार, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी बोदर्डे परिसरात ७ रोजी रात्री बिबट्याने धुमाकूळ घालून एका शेतकऱ्यांचे वासरू ठार केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
योगराज संदानशीव यांच्या बेटावद रस्त्यावरील शेतात गुरे बांधलेली असतात. सकाळी शेतकरी शेतात गेले तेव्हा एका वासरुचे हिंस्र प्राण्याने पोट फाडलेले दिसून आले. शेतकऱ्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता शेतात बिबट्याची पावले उमटलेली दिसली. त्यामुळे शेतकरी प्रचंड घाबरलेली दिसत होते. वन विभागाला कळवल्यानंतर वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे आणि पशु वैद्यकीय अधिकारी डॉ निर्मला गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा तसेच वासरुचे शव विच्छेदन केले. त्या पाऊल खुणा बिबट्याच्या असल्याचे सांगितले. यावेळी वनपाल सोनवणे आणि वनरक्षक वेलसे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र बोलावून बिबट्या पासून बचाव करण्याच्या सूचना दिल्या. बिबट्या हा कुत्रा आणि त्याच्या डोळ्याला नजरेस पडणाऱ्या प्राण्यांवर हल्ला करतो. बिबट्याला पळवण्यासाठी फटाके फोडणे अथवा आवाज करावा. सतत आवाज केल्यास तो पळून जाईल. एक दिवसात बिबट्या साधारणपणे २५ ते ३० किमी प्रवास करतो त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन त्याला पिटाळून लावणे हा पर्याय सांगितला. शेतकरी संदानशिव यांनी मदतीची मागणी केली आहे.