कोरोना काळापासून दरमहा सकस आहार किट वाटप, दात्यांना मदतीचे आवाहन…
अमळनेर:- एचआयव्ही ग्रस्त पीडित बालके, कुणाला बाप नाही तर कुणाला आई नाही, कुणाला आई वडील दोघेही नाही अशाही परिस्थितीत ही निरागस बालके सुदृढ आयुष्य जगत आहे, याचे कारण म्हणजे त्यांना मिळालेला आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लबचा आधार आहे. या दोन्ही संस्थांच्या प्रयत्नांनी या बालकांना नियमित दरमहा सकस आहार व किट मिळत असल्याने मोठे पुण्यकर्म अमळनेर शहरात घडत आहे.
खरेतर आतापर्यंत नियमित हा उपक्रम सुरू असला तरी यापुढेही या पीडित बालकांना चांगले व सदृढ आयुष्य द्यायचे असेल तर समाजातील दानशुर दात्यांनी पुढे येण्याची गरज खरी आहे. आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत यामुलांना नुकतेच या महिन्याचे न्यूट्रिशन किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत होते. सुरवातीला प्रास्ताविक आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील व रोटरी प्रेसिडेंट प्रतीक जैन यांनी केले. त्यांनी कार्यक्रम विषयी माहिती देऊन दात्याचे आभार मानले. मागील दोन महिन्यापासून रेशन किट साठी धुळे येथील युकेला स्थायिक असलेले रोहन साळुंखे यांनी भरघोस मदत केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले व या उपक्रमासाठी अधिक दात्यांची गरज असल्याचे आवाहन सर्वाना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अमळनेर पत्रकार संघ आपल्यासोबत असून अजून अनेक दात्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यात येईल. या चांगल्या कार्यात आमचा पत्रकार संघ नक्कीच येईल अशी ग्वाही दिली. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते दर्शन जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रतीक जैन, राजेश जैन , देवांश शहा, चेलाराम सैनानी, विजय पाटील, डॉ दिलीप भावसार, पुनम कोचर व आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद या प्रकल्पाचे समन्वयक संजय कापडे, राकेश महाजन, नंदिनी मैराळे, पुनम पाटील, मुरलीधर बिरारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भदाणे यांनी केले व सदर कार्यक्रमात प्रोटीन किट रमेश चंपालाल जैन यांच्या स्मृतिपत्यार्थ श्रीमती सविता जैन व त्यांचे परिवार यांच्याकडून देण्यात आले. दर्शन जैन व परिवाराने दरवर्षी ऑगस्ट महिन्यात या कार्यक्रमाचे दातृत्व स्वीकारले. आभार प्रदर्शन सचिव दर्शन कोठारी यांनी केले.