मुंदडा ग्लोबल स्कूलच्या विशेष व्यवस्थेचा पालकांसह खगोलप्रेमींनी घेतला लाभ…
अमळनेर:- चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर टेकले अन एकच जल्लोष झाला. “भारत माता की जय”चा घोष, फटाक्यांचा आवाज आणि सर्वांच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य पसरले.एन टी मुंदडा ग्लोबल स्कूल शाळेने मोठ्या डिजिटल पडद्यावर उपलब्ध केलेल्या सुविधेचा अनेक शाळकरी विद्यार्थी, पालक आणि खगोल, अवकाश, विज्ञान प्रेमींनी लाभ घेतला.
चांद्रयान ३चे लँडिंगचा ऐतिहासिक क्षण थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर चांगल्या पद्धतीने विद्यार्थीसह, पालक, शिक्षक, विज्ञान प्रेमी, अवकाश प्रेमी यांना पाहता यावा म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा, संचालक अमेय मुंदडा, प्राचार्य लक्ष्मण लजपथ यांनी विशेष व्यवस्था केली होती. अंबिका फोटोतर्फे मोठा डिजिटल पडदा, सर्वांना आवाज ऐकू येईल असे स्पीकर लावण्यात आले होते. चांद्रयानाचा वेग जसा कमी होत गेला आणि यान चंद्राजवळ पोहचत होता तशी विद्यार्थी सह पालकांची उत्कंठा शिगेला पोहचली. यान १० मीटर अंतरावर आले आणि सर्वांचे श्वास रोखले गेले. यान चंद्राच्या भूमीवर टेकले अन जोरात घोषणाबाजी सुरू झाली. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी शाळा व आजूबाजूचा परिसर दुमदुमला होता. एकमेकांना टाळ्या देऊन हस्तांदोलन करून आनंद व्यक्त करण्यात आला. शाळेने सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार ही व्यक्त करण्यात आले.