शेतकरी दिलीप शेटे हे आपल्या पत्नीसह सदर घरात वास्तव्यास होते. घरात सगळ्या संसारोपयोगी वस्तू व देखणे असे सजलेले घर त्यांचे होते. तीन मुलींचे लग्न करून एकट्या मुलाचे अभियांत्रिकीचे शिक्षण करून त्यांचा शेती व्यवसायावर संसारगाडा सुरू होता. सकाळी आठ वाजेच्या सुमारास दिलीप शेटे यांच्या पत्नी शेतात गेल्या तर दिलीप शेटे हे घराला कुलूप लावून मंदिरात दर्शनासाठी गेले होते. काही वेळातच शेजारील ग्रामस्थांना अचानक घराच्या छतातून आगीचे धूळ दिसू लागले. नागरिकांनी धाव घेतात घरात धूळ दिसू लागल्याने आग लागल्याचे समजले. ग्रामस्थांनी हिंम्मत करून घराचे दार उघडून व घराच्या छतावर जाऊन सर्व धाबे पाडले. आगीच्या ज्वाला व धूर हे भयावह दिसत असल्याने ग्रामपंचायतीने तात्काळ गल्लीत पाण्याचे नळ सोडले.ग्रामस्थांनी नळ्या लावत आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. घरातील प्रत्येक वस्तू जळून खाक झालेल्या होत्या. साजेसं अस सुंदर घर आगीने काळे पडले असून रेफ्रिजरेटरचा स्फोट घडून आला आहे.घरातील कोणत्याच वस्तू उपयोगात आणण्यासारख्या राहिलेल्या नसून आगीने संपूर्ण घरात जम करून सगळा लाखो रुपयांचा संसार उध्वस्त केला आहे. दिलीप शेटे यांच्या पत्नी जमविलेला संसार डोळ्यासमोर जळून खाक झाल्याने अक्षरशः आकांताने रडत होत्या. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी अग्निशमन दलाची गाडी पाठवली होती. पण त्याआधी नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले होते. वेळेवर आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारील बंद घरांचे देखील नुकसान टळले. तरीदेखील अग्निशमन गाडीने घरावर पाण्याचे फवारे सोडले. तहसीलदार यांनी तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले असून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी देखील पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा केलेला आहे. पातोंडा ग्रामस्थ जात पात धर्म न पाहता गावातील कोणत्याही कुटुंबावर आलेल्या नैसर्गिक किंवा अनुचित संकटात धावून मदत नेहमीच मदत करीत असतात याचा प्रत्यय देखील ह्या घटनेत पहावयास मिळाला. आगीने संपूर्ण घर व संपूर्ण संसारोपयोगी सामान,धान्य,डाळी व इतर सर्व उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने लाखो रूपयांची हानी झालेली आहे. आजच्या आज दिलीप शेटे यांचे कुटुंब उघड्यावर आले असून शासनाने व लोकप्रतिनिधी यांनी शेतकरी दिलीप शेटे यांना शासकीय मदत मिळवून द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.
पातोंडा ता.अमळनेर:- येथील चंद्रशेखर आझाद चौकमधील रहिवासी दिलीप शामराव शेटे या शेतकऱ्याच्या घराला मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजेच्या सुमारास बंद घरात शॉर्टसर्किटने आग लागून घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू आगीने खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने व हिम्मतीने पुढाकार घेत वेळेवर आगीवर नियंत्रण आणून आग विझवून मोठा अनर्थ टाळला.
गल्लीबोळातील अतिक्रमण काढण्याची आग्रही मागणी…
पातोंडा हे लोकसंखेच्या दृष्टीने मोठे गाव असून जवळपास तेराशेच्या आसपास घरांची संख्या आहे. जिकडेतिकडे मुख्य गल्लीबोळात नागरिकांनी अतिक्रमण केल्याने भविष्यात अशा आगीच्या मोठ्या घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी जाऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचू शकणार नाहीत तर मोठ्या आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने मुख्य गल्लीबोळात वाहनास येण्या-जाण्यास अडचण ठरणारे अतिक्रमण काढावे अशी आग्रही मागणी देखील ग्रामस्थांकडून होत आहे.