
तालुक्यातील पाच मंडळात झाला ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस…
अमळनेर:- गेल्या दीड महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने अतिवृष्टीच्या रूपाने हजेरी लावली आहे. तालुक्यात पाच मंडळात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

सुमारे ४० दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने पिके करपून गेली होती. उडीद मुग ही पिके देखील आली नाहीत तर पावसाच्या खंडामुळे कापूस,मका देखील हातचा गेला आहे. ज्यांचे क्षेत्र बागायती आहे त्यांची पिके ही जेमतेम तग धरून आहेत. मात्र आता त्यांच्याही विहिरी कोरड्या पडू लागल्या होत्या.
दिनांक ८ रोजी संततधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतात, रस्त्यांवर देखील पाण्याचे डबके साचले आहेत. तालुक्यात सरासरी ६५.७० मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. निसर्गाचे पाणी मिळाल्याने नत्रयुक्त खत त्यातून मिळणार असल्याने आहे त्या पिकांना ऊर्जा मिळेल. तग धरलेल्या कापूस आणि मका पिकाला आधार मिळणार आहे. काही प्रमाणात तरी उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यात अमळनेर मंडळात सर्वाधिक ९१.५० मिमी, शिरूड मंडळात ७१.३० मिमी, पातोंडा मंडळात ४३.३० मिमी, मारवड मंडळात ८० मिमी, नगाव ६७.८ मिमी, अमळगाव ५०.३०मिमी, भरवस मंडळ ६५.३० मिमी, वावडे मंडळ ५६.३० मिमी असा तालुक्यात सरासरी ६५.७० मिमी पाऊस पडला आहे.




