
नगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी…
अमळनेर:- नगरपालिकेकडून रस्त्यातील खड्ड्यावरील झाकण दुरुस्त केले जात नाही म्हणून अपघात टाळण्यासाठी नागरिकांनीच पर्याय शोधला असून खड्ड्याच्या पुढे दगड व फरशी लावून आडोखा उभा केला आहे.

शहरातील पिंपळे रोडवरील स्वामी विवेकानंद नगरसह अनेक भागात रस्त्याच्या मधोमध पिण्याच्या पाण्याचा व्हॉल्वचा खड्डे असून त्यावरील लोखंडी जाळी तुटलेली असल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहेत. रस्त्यातच हे खड्डे असल्याने अचानक वाहने खड्डयात गेल्याने वाहनांचे नुकसान होऊन नागरिकांना दुखापती होत आहेत. अनेक दिवसांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत. पालिकेकडून दुरुस्ती होत नाही म्हणून अखेर स्वामी विवेकानंद नगर भागातील नागरिकांनी खड्डयापुढे फरशी उभी केली आहे. ती पडू नये म्हणून मोठा दगड आडवा लावला आहे. मात्र हे देखील धोकादायक आहे. रात्री अंधारात फरशी व दगडालाही ठोकर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


