महामंडलेश्र्वर हंसानंद महाराज यांनी ऋषींपंचमी महात्म्यावर केले प्रवचन..
अमळनेर:- तापी व पांझरा नदीच्या संगमस्थळी ऋषीपंचमी निमित्त शाही स्नानासाठी जळगाव धुळे नंदुरबारसह संपूर्ण खान्देशातुन महिला भाविकांची अलोट गर्दी होऊन पहाटे पाच वाजेपासून सायंकाळपर्यत १० हजार महिलांनी शाही स्नान करून पुरातन कालीन “श्रीक्षेत्र कपिलेश्वर” त्रिपीडी महादेवाचे दर्शन घेतले. नदीपात्रात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने मंदिर संस्थानकडून महिला स्वयंसेवक तैनात केले होते. यावेळी पार्थिव शिवलिंग पूजन, ऋषी पूजन, तापी आरती व महामंडलेश्र्वर हंसानंद महाराज यांनी ऋषीपंचमी महात्म्यावर प्रवचन आदी कार्यक्रमाची दिवसभर रेलचेल दिसून आली. महिला भाविकांच्या अलोट गर्दीमुळे निम ते श्रीक्षेत्र कपिलेश्वर दरम्यान दोन किलोमीटर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या. मारवड पोलीस ठाण्यातील सपोनि व महिला पोलिसांनी वाहनचालक व महिलांना सुरक्षितता म्हणून सहकार्य केले.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर हे खान्देशातिल जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.काल दिनांक २० रोजी ऋषिपंचमीच्या निमित्त तापी पांझरा संगमस्थळी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ातील जवळपास दहा हजार महिला भाविकांनी स्नान व तापी पुजन करून महादेवाच्या त्रिपीडी शिवलिंगांचे मंदिरावर दर्शन घेऊन महामंडलेश्र्वर हंसानंद महाराज यांचे ऋषीपंचमी निमित्त आयोजित प्रवचनाचा लाभ घेतला. ऋषिपंचमीला संगमस्थळी अशा पावित्र्य तीर्थस्थानावर स्नान केल्याने, दुःख पीडा दूर होऊन संकट नष्ठ होत असल्याची महिमा असल्याने खान्देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला भाविकांची गर्दी झाली होती. आचार्य महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांनी दुपारी एक ते अडीच वाज़े दरम्यान ऋषिपंचमी या महात्म्यामावर प्रवचन केले.नंतर महिलांनी पुजेला सुरुवात केली. कपिलेश्वर तीर्थक्षेत्री ऋषिपंचमी निमित्त तापी पांझरा संगमस्थळी शाही स्नान,ऋषीपूजन,तापी आरती, कथाप्रवचनसाठी मंदिरावर दर्शनासाठी जळगाव, भुसावळ, शिरपुर,धुळे,नंदुरबार अशा अनेक ठीकाणाहून महिला आल्या होत्या. यामुळे मंदिर परिसरला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.मंदिरावर पुजेच्या साहित्याची निम, मुडावद , अमळनेर येथील विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मंदिराचे अध्यक्ष विश्वस्त श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट मुडावद निम (तापी पांझरा संगम)व समस्त भक्त परिवार यांनी बाहेर गावाहुन येणाऱ्या भाविकांसाठी निवास व प्रवचन ऐकण्यास मंडप टाकून बसण्याची व विसाव्याची सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, हवालदार सुनील तेली,मुकेश साळुंखे,फिरोज बागवान,अनिल राठोड आदींसह याठिकानी महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला होता. तर नंदादीप माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांनी स्काऊटचे विद्यार्थ्यांकडून मदत व सहकार्य केले. कपिलेश्र्वर मंदिर संस्थानचे सचिव मघन पाटील, विश्वस्त तुकाराम पाटील, सी एस पाटील यांनी महिलांच्या नदीपात्रात स्नानासाठी विशेष काळजी म्हणून महिला स्वयंसेवकांकडून डोहात न उतरता काढावरच स्नान करण्याचा सुचना ध्वनिक्षेपकावर वारंवार केल्या गेल्याने मदत मिळाली. मात्र मंदिरा पर्यंत जाणारी बस सेवा अमळनेर आगारातून बंद झाल्याने अनेक महिला भाविक नीम येथुन पायी प्रवास करत कपिलेश्र्वर मंदिरा पर्यत आल्या तर खाजगी वाहनचालकांनी थेट अमळनेर व कळमसरे नीम येथून प्रवासी महिलांना मंदिरापर्यंत सोडण्याचे सहकार्य केले.