मंदिर परिसरासह शहरात विविध विकासकामांची होणार उद्घाटने…
अमळनेर:- येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी ‘श्री मंगळ जन्मोत्सव’ परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. मंदिर परिसरासह शहरातही विविध विकास कामांची उद्घाटने होतील.
शहरातील बसस्थानकात अॅक्वा चिल्ड (शुद्ध व गार) पाणीपुरवठा करणाऱ्या अद्ययावत श्री मंगल जलकुंभाचे उद्घाटन व आगमन आणि निर्गमन भव्य प्रवेशद्वारांचे भूमिपूजन होणार आहे. राज्यातील नितांत सुंदर पोलिस चौकींच्या श्रेयनामावलीत अग्रेसर ठरेल अशा पैलाड भागातील ‘श्री मंगळग्रह पोलिस चौकी’चेही उद्घाटन होईल.तसेच श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील नवीन भव्य स्वयंपाकगृह, नवीन अभिषेक बुकिंग कार्यालय, रेडिओ मंगलध्वनी हा आमच्या संस्थेचा रेडिओ व अद्ययावत रेडियो केबिन, श्री मंगळग्रह मंदिराचे ग्लासवर्कने केलेले सुशोभीकरण, ‘आय प्रे मंगल’ कलाकृती आदींचे उद्घाटने होतील. नाल्यावरील दमदम्याच्या कामाचे भूमिपूजन होईल. तसेच लवकरच आगळ्यावेगळ्या शैलीत दैनिकात परावर्तीत होणाऱ्या साप्ताहिक ‘महातेज’ व मासिक ‘मंगल कामना’ या मासिकाचेही प्रकाशन होणार आहे. शिवाय विविध स्पर्धा परीक्षार्थींना मार्गदर्शन, शेतकरी बांधवांना मार्गदर्शन व पत्रकारांसाठीही कार्यशाळेचे आयोेजन केले आहे.
उद्घाटनपर सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील असतील तर उद्घाटक, मार्गदर्शन व प्रकाशक म्हणून खासदार उन्मेश पाटील लाभणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मा. आ. स्मिता वाघ, मा.आ. शिरीष चौधरी, विशेष पोलिस महानिरीक्षक कैसर खालिद, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, पुण्याचे ख्यातनाम उद्योगपती वेंकटेश राव, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, माय एफ. एम. रेडिओचे इंडिया हेड सौरभ वाडेकर, जैन उद्योग समुहाचे व्हाईस प्रेसिडेंट (मीडिया) अनिल जोशी, अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर, पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, एस. टी. महामंडळ, जिल्हा विभाग नियंत्रक भगवान जगनोर, प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, व्हाईस ऑफ मीडिया (उर्दु विंग)चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, प्रदेशाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, रोमीफो इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी, म.रा.म. पत्रकार संघाचे उ.म. अध्यक्ष प्रवीण सपकाळे, नाशिकचे ख्यातनाम करिअर कौन्सिलर राजेंद्र वर्मा आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. शहरातील सर्व महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते पालखी पूजन, पालखी मिरवणूक, श्री स्वामी समर्थांची आरती, श्री महादेवांची आरती, श्री मंगळग्रह मंदिरातील विविध महाआरत्या सायंकाळी ५ ते ६.३० दरम्यान होणार आहेत. कार्यक्रमात पहिली संबळवादक नाशिक येथील तरुणी कु. मोहिनी भूसे यांचे संबळवादन हे विशेष आकर्षण असणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे यांनी केले आहे.