
ऑनलाईन लिंकद्वारे सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- दोन कोटी लोक अहिराणी भाषा बोलतात, अहिराणी भाषेचा वारसा जतन रहावा व अस्तित्व टिकून रहावे, भाषेतील साहित्याला चालना देण्यासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे आजपासून दुसऱ्या विश्व अहिराणी संमेलनाची सुरवात होणार असून दि. 22, 23 व 24 जानेवारी असे सलग तीन दिवस ऑनलाईन पध्दतीने हे संमेलन सुरू असणार असल्याची माहिती पातोंडा येथील मूळ रहिवासी व अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी काम करीत असलेल्या कोकणप्रदेश अध्यक्ष मगन सुर्यवंशी व मराठवाडा प्रदेश अध्यक्ष विनायक पवार यांनी दिली.
या संमेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ.एस.के.पाटील असणार असून स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण राहतील. संमेलन हे दि.22,23 व 24 जानेवारी रोजी पहिल्या सत्राची वेळ दुपारी 4 ते संध्याकाळी 6.30 व दुसऱ्या सत्रात संध्याकाळी 7.30 ते 9.30 अशी असणार असून सोशल मीडियाच्या फेसबुक, टेलिग्राम, युट्यूब, इन्स्टाग्रामच्या ऑनलाईन लिंकवर जाऊन संमेलनात सहभाग नोंदविता येणार आहे. संमेलनात सर्व खान्देशी व अहिराणी भाषा संवर्धन विकास व साहित्यकांचे मौलिक विचार आणि कथा, कविता, नाटिका, परिसंवाद, पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, संस्कृती, लोकनृत्य यांची धुंद सफर अनुभवता येण्यासाठी तसेच देश-विदेशातील नामवंत साहित्यिकांची भेट होण्यासह रंगतदार कार्यक्रमाची तीन दिवस रेलचेल गुजर, लेवा, भिलाऊ, आदिवासी व ग्रामीण बोली भाषेतील लेख, निबंध, साहित्य, चारोळ्या, विनोद, कविता, वात्रटिका, विडंबन यांचेही ई-बुकच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. तरी अहिराणी भाषा प्रेमींनी ह्या ऑनलाईन संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्याध्यक्ष विकास पाटील, कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे, प्रथम विश्व अहिराणी संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी केले आहे.

