
अमळनेर:- येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीच्या स्थगिती बाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
कोविड संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन सुचना व आदेश शासन स्तरावरून व मंत्रालयातून दिले जात आहेत शासनाच्या सुचनांचे व आदेशांचे तंतोतंत पालन करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. तथापि असे असताना महाराष्ट्रात नुकत्याच नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या व हजारो लोकांच्या उपस्थितीत विजय मिरवणुका काढण्यात आल्यात अमळनेर मध्ये देखील खा. शि. निवडणूकीबाबत सर्व कामकाज प्रचार सुरू असताना ऐनवेळी निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयोजन जनतेच्या लक्षात येण्यासारखे नाही. विद्यमान खा शि संचालक पदभार असाच सुरू ठेवावा यासाठी राजकीय डावपेच तर नाही? असा सवाल जनतेतुन पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाची भूमिका निष्पक्षपाती आहे असे सिद्ध करण्यासाठी खा.शी. शिक्षण मंडळावर त्वरित व तात्काळ प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे. अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलनाची भुमिका घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष गुलाब पाटील,युवक तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील,शहर अध्यक्ष प्रविण पाटील, दिनेश पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.




