विनापरवानगी शहापूर ते तांदळी रस्त्याची साईडपट्टी कोरत केली घाण…
अमळनेर:- तालुक्यातील शहापूर ते तांदळी या रस्त्यावर फायबर केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने पोकलँड मशीनने साईडपट्टी कोरत रस्त्यावर खड्डे करून चांगल्या रस्त्याचे तीनतेरा केले आहेत.
शहापूर ते तांदळी रस्त्याच्या कडेला एअरटेल कंपनीचे फायबर केबल टाकण्याचे काम सुरू असून पोकलँड मशिनच्या माध्यमातून खोदकाम सुरू आहे. मात्र हे काम विनापरवानगी सुरू असून सदर ठेकेदार कोणाचीही तमा न बाळगता मनमानी पद्धतीने खोदकाम करत आहे. सां.बा.च्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासून ९ मिटर अंतरावर खोदकाम करणे अपेक्षित असताना सदर ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला चारी खोदत नेली आहे. तसेच पॉकलँड मशीनचा वापर केल्याने रस्त्यावर खड्डे पडत आहेत. त्यामुळे चांगल्या रस्त्याचे तीनतेरा होत असून रहदारीचा रस्ता खराब होत आहे. त्यामुळे तांदळी येथील स्वप्नील परदेशी व कपिल परदेशी यांनी हे काम बंद पाडत संबंधितांकडून परवानगीचे मागितली असता त्यांच्याकडे परवानगी नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी काम बंद पाडले आहे. मात्र अश्या विनापरवानगी काम करणाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नसून शासनाचे नुकसान होत आहे आणि त्रास प्रवाश्यांना भोगावा लागत असून रहदारीचा रस्ता सुस्थितीत न करून दिल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिक्रिया….
सदर ठेकेदाराची परवानगी अद्याप प्रतीक्षेत असून रस्त्याच्या कडेला खोदण्याची परवानगी नसून ठेकदाराने रस्त्याचे नुकसान केले असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच रस्ता सुस्थितीत करून घेण्यात येणार आहे.
:- हेमंत महाजन, उपकार्य. अभियंता, सां.बा. विभाग अमळनेर