अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम…
अमळनेर:- वृत्त संकलनासाठी नेहमीच भटकंतीवर असणाऱ्या शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवाना अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने विमा सुरक्षा कवच देण्यात आले असून नवरात्रीच्या मुहूर्तावर एकाच दिवशी असंख्य पत्रकार बांधवांचा विमा काढून याचा शुभारंभ करण्यात आला.
पत्रकार बांधवांना विविध ठिकाणी बातमी संकलनासाठी जावे लागत असते,याशिवाय इतर कोणत्याही कामानिमित्त नेहमीच त्यांचा बाहेरगावी प्रवास सुरु असतो,याव्यतिरिक्त तालुका परिसरात कुठेही आपत्ती अथवा इतर घटना घडल्यास सुरवातीला पत्रकारच तिथे पोहोचत असतो. यामुळे पत्रकारांचे विमा कवच असणे ही आज काळाची गरज झाली आहे आणि हेच कवच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने संघटनेतील पत्रकार बांधवाना देण्यात आले. सदर विमा अपघाती विमा असून तो भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून काढण्यात आला. सदर विमा धारकास अपघाती मृत्यू आल्यास कुटुंबास 10 लाख तर कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख लाभ मिळणार आहेत. याशिवाय इतर अनेक लाभ देखील मिळणार आहेत.दर वर्षी नूतनीकरण करण्याचा मानस पत्रकार संघाचा आहे.
या उपक्रमासाठी डाक निरीक्षक भरत चौधरी,पोस्ट मास्तर आबासाहेब साळुंखे,सहा पोस्ट मास्तर आर आर बाविस्कर तसेच पोस्टमन पुष्पा माळके, स्वाती देवरे, कल्याणी पाटील,हरी बडगुजर यांचे सहकार्य लाभले. यावेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,संजय पाटील, किरण पाटील,महेंद्र रामोशे, पांडुरंग पाटील,आर जे पाटील, मुन्ना शेख,अमोल पाटील, गणेश पाटील,संभाजी देवरे,डॉ विलास पाटील, बाबूलाल पाटील, वसंतराव पाटील, श्यामकांत पाटील, विजय पाटील,युवराज पाटील, अनिल पाटील यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.