
अमळनेर :- सुरत येथील दहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करून फरार होणाऱ्या आरोपीस अमळनेर रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्याला सुरत (गुजरात) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दि.१८ जानेवारी रोजी सुरत पांडेसरा पोलीस स्थानकात कर्तव्यावर असणारे पीएसआय दिपेंद्र सिंग यांनी अमळनेर रेल्वे स्थानकावरील आरपीएफचे एएसआय कुलभूषण सिंग चव्हाण यांना मोबाईलवरून माहिती दिली की,आरोपी मनोजसिंग राजेंद्र (वय ४९ रा.श्रीराम नगर पांडेसरा सुरत) हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका १० वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झाला असून तो अमळनेर शहराच्या आसपास रेल्वेने प्रवास करीत आहे.सदरील माहितीवरून कुलभूषण सिंग चव्हाण यांनी आरोपीचा फोटो सुरत पॅसेंजर मधील अमळनेर, धरणगाव, चावलखेडा, जळगाव येथे कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठविला आणि सुरत-भुसावळ रेल्वे गाडीची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच एएसआय चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कॉन्स्टेबल अर्जुन सिंग,संतोष कुमार यादव,दिनेश मांडळकर यांचे पथक तयार केले.त्यांनी सुरत गाडीमध्ये बसून जळगाव पर्यंत आरोपीचा शोध घेतला. सायबर गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीवरून जळगाव स्थानकावर आरोपीस जनरल डब्यातून ताब्यात घेण्यात आले. त्याला सुरक्षित स्थळी नेत चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.एएसआय कुलभूषण सिंह चौहान यांनी कागदपत्रांची पूर्तता करून आरोपीस पांडेसरा (सुरत) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.