अमळनेर:- शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट यु डायस मध्ये अपडेट करण्यासाठी रक्तगट काढणे आवश्यक केले आहे. मात्र रक्त गट तपासणीचे साहित्य उपलब्ध नसल्याने शासनाने कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी आधी उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांचा अपार आय डी काढण्यासाठी यु डायस मध्ये रक्तगट अपडेट करावा लागणार आहे. मात्र शासनाकडे रक्त गट तपासण्याचे किट उपलब्ध नसल्याने शाळा व विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. रक्तगट तपासणीसाठी ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांना तालुक्यावर भाडे खर्चून यावे लागणार आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त गट तपासणे ही खर्चिक बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी किंवा शासकीय रुग्णालयात जावे लागणार आहे. शासकीय रुग्णालयात रक्त तपासणीचे किट तेव्हढ्या प्रमाणात शिल्लक नसल्याने विद्यार्थी माघारी फिरत आहेत. तर खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी साठ रुपये खर्च लागणार आहे. गरिबांचे पालक हा पैसा द्यायला तयार नाहीत. आणि शासन कालमर्यादा ठरवून आदेश काढते.
प्रतिक्रिया:-
ग्रामीण रुग्णालयाला दर महिन्याला मर्यादित किट उपलब्ध असतात आणि वाढीवसाठी कोणतेही अनुदान नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त गट चाचणी होऊ शकत नाही. यासाठी वरिष्ठांशी सल्लामसलत केली जाईल.
डॉ प्रांजली पाटील, ग्रामीण रुग्णालय,अमळनेर
प्रतिक्रिया:-
अपार आयडी साठी पालकांची संमती लागणार आहे. यु डायस अपडेट करताना रक्त गट चाचणी साठी अडचणी आहेत. त्यावर काही उपाययोजना करता येईल का यासाठी वरिष्ठांशी चर्चा केली जाईल.
रावसाहेब मांगो पाटील, गटशिक्षणाधिकारी ,पंचायत समिती अमळनेर
प्रतिक्रिया:-
शासनाने विद्यार्थी व शिक्षक यांची ससेहोलपट करण्यापेक्षा शाळांवरच शासकीय रुग्णालयामार्फत रक्त गट तपासणी शिबीर लावण्यात यावे.
-प्रभूदास पाटील, शिक्षक – स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय, मंगरूळ ता. अमळनेर