अमळनेर:- शहरातील प्रताप महाविद्यालयात प्राध्यापकांच्या 19 जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी संस्थाचालक जीवापाड मेहनत घेत असून एका जागेसाठी 80 लक्ष रुपयांची लाच संस्था चालकांना द्यावी लागत असल्याचा सनसनाटी आरोप प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ एल ए पाटील यांनी केला आहे, याबाबत डॉ पाटील यांनी लेखी स्वरूपात खान्देश शिक्षण मंडळाकडे तक्रार केली आहे.
शासनाने उच्च महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी अधिकार संस्थाचालकांना दिलेले असल्यामुळे सहाय्यक प्राध्यापकांच्या पद भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असतो. गुणवत्तेने उत्तम असूनही आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या प्रत्येक जात संवर्गातील होतकरू तरुणांकडे ८० लक्ष रुपये लाच देण्याची कुवत नसल्याने त्यांना महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पद भरतीत संधी मिळत नाही. उच्च अर्हता असूनही समान संधी न मिळणे हे घटनेतील कायद्यांचे उल्लंघन नव्हे काय ? असा सवाल उपस्थित करत डॉ पाटील यांनी प्राध्यापक भरतीत कोणाला किती पैसा चारावा लागतो,याचे वर्णन केले आहे. एका गरीब मात्र गुणवंत विद्यार्थ्यांने आपल्या कडे याबाबत वाच्यता केल्याचा दावा डॉ पाटील यांनी तक्रारीत केला असून त्यांनी आगामी शिक्षक प्राध्यापक भरती पारदर्शक पद्धतीने करावी, अशी मागणी केली आहे