तीन बोटे तोडली, गंभीर जखमी झाल्याने धुळे येथे उपचार सुरू…
अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथे महिलेच्या डोक्यात धारदार शस्राने वार करून तिची तीन बोटे तोडल्याची घटना काल सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
सुनीता प्रदीप भिल (वय ३० रा थाळनेर ता शिरपूर) ही महिला आपल्या पतीसह जानवे येथे नातेवाईकांकडे आली होती. २१ रोजी सकाळी ती जानवे येथे पतीसोबत शेतात कामाला गेली असता तिच्या डोक्यावर धाऱ्याने तीन वार करत तिच्या हातावर वार करून डाव्या हाताचा अंगठा तोडला व उजव्या हाताची दोन बोटे तोडली. साधारणत दहा वाजेच्या सुमारास शेतातून महिला घरी परतल्यावर ही बाब उघडकीस आली. जखमी सुनीताला जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ मयुरी महाजन यांनी प्रथमोपचार केले. मात्र सुनिताची प्रकृती गंभीर असल्याने तिला धुळे येथे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. तिच्या डोक्याला ३५ टाके पडले आहेत. सुनिताच्या डोक्यावर तिच्या पतीनेच वार केल्याचे समजते तिचा पती फरार झाला आहे. सुनीता जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने सकाळी धुळे पोलीस तिचा जबाब घेणार आहेत.