
सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…
अमळनेर:- येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात चोरी झाली असून अद्याप पोलिसात तक्रार दाखल का करण्यात आली नाही असा सवाल अनंत निकम यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी काल अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात नमूद केले आहे की, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात साऊंड सिस्टीम व इतर महत्त्वाच्या वस्तूंची चोरी झाली असल्याचे समजले असून सुमारे साडे सोळा लाखाच्या वस्तू चोरीस गेल्याचे समजते. त्याचा पंचनामा ही करण्यात आला आहे. याची वाच्यता कुठेही करण्यात आली नसून नगरपालिका प्रशासनाने कोणतीही पोलीस तक्रार दाखल केली नाही. नागरिकांच्या करातून हे नाट्यगृह उभारले असून त्यात एवढी मोठी चोरी झाली कशी ? तसेच चोरी झाल्यानंतर ही पोलिसात तक्रार का दाखल केली नाही ? असा सवाल करण्यात आला आहे. तसेच लवकरात लवकर पोलिसात तक्रार करावी जेणेकरून चोरटे पकडले जावून चोरीस गेलेल्या वस्तू परत मिळण्यास मदत होईल.
नगरपालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची जनसामान्यात चर्चा…
अमळनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह हे तयार झाल्यानंतर त्याचे पालिकेकडून लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला नाही. त्याआधीच ते एका नाट्यसंस्थेला भाड्याने देण्यात आल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना समजले. त्यानतंर आता नाट्यगृहात भली मोठी चोरी झाल्याचे उघडकीस होवून ही याची वाच्यता कोठेही केली नाही तसेच पोलिसात तक्रार ही दाखल करण्यात आली नाही. यावरून एकंदरीतच पालिका प्रशासनाचा कारभार संशयास्पद असल्याची चर्चा जनसामान्यात आहे.