प्रांताधिकारी खेडकर यांना दिले निवेदन,आजपासून साखळी उपोषणास सुरुवात…
अमळनेर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन महाराष्ट्रभर चालू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण करण्याचा निर्णय अमळनेर येथील मराठा बांधवानी घेतला असून यासंदर्भात अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणुन गेली वीस वर्ष महाराष्ट्रात विविध आंदोलने सुरु आहेत. आरक्षणाचा प्रश्न हा लाखो समाजबांधवांच्या सन्मानाचा व जीविताचा प्रश्न असून मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात एक निर्णायक आंदोलन अंतरवाली सराटी येथे सुरु केले आहे. या प्रश्नाबाबत आपल्या जीवाची बाजी लावुन होत असलेल्या या व्यापक आंदोलनाबाबत शासनाची भुमिका हि संथ व दुर्लक्षित वेळकाढूपणाची राहिलेली आहे. वेळोवेळी मिळणाऱ्या खोट्या आश्वासनांना व मंत्र्यांच्या भूलथापांना मराठा समाज कंटाळला असून हे आंदोलन आता एका निर्णायक वळणावर उभे आहे.आतापर्यंत ५६ विशाल मोर्चे, ५० च्या वर तरुणांच बलिदान या आंदोलनाने घेतले आहेत. शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ऐतिहासिक वारसा व योगदान असणाऱ्या ‘मराठा’ समाजाच्या न्याय मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न निषेधार्य आहे. याबाबतीत मराठा समाजाचा मनात प्रचंड चीड व तीव्र संताप असून हि भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही समाजबांधवांनी दि. ३१ ऑक्टोंबर पासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.राज्यभर चालू असलेल्या मराठा आंदोलनाच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे विविध पातळीवर टप्या टप्याने आंदोलन तीव्र करण्यात येईल. तरी या बाबींची गांभीर्याने नोंद घेऊन शासन दरबारी मराठा समाजाची भावना मांडण्यासाठी या साखळी उपोषणाची नोंद घ्यावी ही विनंती यात केली आहे..