तालुक्यातील सिंचन प्रकल्पाबद्दल माहिती देवून ठरवणार आंदोलनाची पुढील दिशा…
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे धरण व प्रलंबित सिंचन प्रश्नांबाबत दिनांक १६ रोजी दुपारी १२:३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील विकासाला चालना देणारा पाडळसरे आणि त्यावरील उपसा सिंचन योजना प्रलंबित आहे. जिल्ह्यातील जामनेर व चाळीसगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना राज्य व केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळून प्रकल्प मार्गी लागून आणि पूर्णत्वाच्या अनुषंगाने वाटचाल करत आहेत. मात्र कायमस्वरूपी अवर्षणप्रवण भागातील १९९७ पासून दुर्लक्षिला गेलेला पाडळसरे प्रकल्पाबाबत विकासात्मक चर्चा आणि धरण मार्गी लागण्यासाठी लोकचळवळीला बळ मिळावे तसेच त्याद्वारे लोकांना जलसाक्षर करण्याबाबत राष्ट्रीय पातळीवर जलअभ्यासक, सारथीचे निवृत्त मुख्य अभियंता व तापी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अशोकराव नारायण पवार हे मार्गदर्शन करणार असून दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता मंगळग्रह मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्वसामान्य माणसाच्या मनातील सोपे पण आजवर स्पष्ट न झालेले प्रश्न जाणून घेण्यात येवून शंका कुशंका दूर करण्यात येणार आहेत. पाडळसरे प्रकल्प नेमका काय आहे ? या प्रकल्पामुळे खान्देशी पट्ट्याला काय फायदा होणार आहे ? नागरिकांची या प्रकल्प निर्मितीमध्ये काय भूमिका असेल ? आदी प्रश्नाबाबत चर्चा करून माहिती देण्यात येणार आहे. यात तालुक्यातील सामाजिक चळवळीतील मान्यवर मंडळी व दिवाळीनिमित्त गावाकडे येणारी नोकरदार मंडळी यांची उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीत जलसिंचन प्रश्नांविषयी तळमळ असणाऱ्या मंडळींनी उपस्थित राहावे, अशी विनंती पाडळसरे जनआंदोलन समिती, व जलसिंचन प्रश्नांबाबत आस्था असणाऱ्या मंडळींनी केले आहे.