
‘प्रयोगशाळा ते जमीन’ उपक्रमातंर्गत कार्यक्रमाचे आयोजन…
अमळनेर :- येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळा ते जमीन’ उपक्रमातंर्गत “औषधी वनस्पती लागवड” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा.डॉ.दिगंबर मोकाट हे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप दादा पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्रा. डॉ. दिलीप भावसार यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. विश्वकर्मा यांनी औषधी वनस्पती लागवडीचे महत्व विशद केले व शेतक-यांना मार्गदर्शनासाठी विद्यापीठ तत्पर आहे असे सांगितले. राजेश पांडे यांनी शेतक-यांनी काळाची गरज ओळखून औषधी वनस्पती लागवड करावी. त्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्याला घेता येऊ शकतो. शेतक-याचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांना आपण सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. केंद्र सरकारच्या आयुष विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुणे व जळगाव विद्यापीठाच्या संयुक्त मार्गदर्शनाने शेतकऱ्यांनी जागतिकीकरणाच्या बाजारपेठेचा व परकीय धोरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील विभागीय संचालक व प्रमुख संशोधक पश्चिम विभागीय औषधी विकास वनस्पती सह सुविधा केंद्र (आयुष मंत्रालय भारत सरकार) डॉ.दिगंबर मोकाट यांनी आपल्या परिसरात व खान्देशात येणा-या औषधी वनस्पतीचे प्रकार,त्यांचे उत्पादन, संगोपन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया, खरेदी विक्री, याबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या परिसरातील वनस्पती व त्याचे औषधी गुणधर्म,वापर याबाबत तरूणांनी अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांनीही या उपक्रमात विद्यापीठ शेतक-यांना सहकार्य,मार्गदर्शन करण्यास तयार असून शासनाच्या कृषी व आयुष या दोन्ही विभागांची यासाठी मदत घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी प्रा.मनिष गोस्वामी (पुणे), प्रा.ए.बी. चौधरी (जळगाव), मा.आ.स्मिताताई वाघ,संजय बिर्ला,सिनेट सदस्य दिनेश नाईक,राजेंद्र नन्नवरे, प्रा.डी.डी.पाटील,डॉ.धीरज वैष्णव, मंगलदास भाटीया,ॲड. प्रदीप कुलकर्णी, प्रा. राधिका पाठक, प्रा.नरेंद्र भोई प्रा.प्रतिक्षा कुलकर्णी, प्रफुल्ल बी. पाटील विरवाडे, महाजन,चुंचाळे उपस्थित होते. या मार्गदर्शन सत्रास अमळनेरसह चोपडा, धरणगाव,शिंदखेडा येथील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा रायगडे तर आभार प्रदर्शन दिनेश नाईक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.