विश्रामगृह परिसरात आज मोफत प्रक्षेपण, क्रिकेटप्रेमींमध्ये संचारला उत्साह…
अमळनेर:- क्रिकेटच्या विश्वकप स्पर्धेत भारत एकही सामना पराभूत न होता अंतिम सामन्यात पोहचल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. सर्वांनी एकत्र अंतिम सामना पाहून आनन्द लुटण्यासाठी क्रिकेट प्रेमींचा ग्रीन अमळनेर ग्रुप, डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन व अमळनेर शहर आणि तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या प्रांगणात मोफत भव्य डिजिटल पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांना अंतिम सामना एकत्रित पाहून जल्लोष करता यावा यासाठी विश्रामगृहाच्या प्रांगणात साफसफाई सुरू झाली आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी देखील सुटीच्या दिवशी साफसफाई करून क्रिकेटप्रेमींचा उत्साह द्विगुणित केला आहे. प्रेक्षकांना डास चावू नयेत म्हणून आणि धुळीचा त्रास होऊ नये म्हणून पाणी मारण्यात येवून फवारणी व पावडर टाकण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींना बसण्यासाठी खुर्च्या, तसेच खाली बसण्यासाठी गाद्या मॅटिंग टाकण्यात येणार आहे. सामना सुरू होण्यापासून तर संपेपर्यंत प्रत्येक चौकार षटकारासाठी ढोल ताशांचा गजर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकवेळी फटाक्यांची देखील आतिषबाजी करण्यात येणार आहे. विविध संस्था आणि दात्यांनी देखील चहा व शुद्ध पाणी याची व्यवस्था केली आहे. जितक्या चुरशीने अंतिम सामना होणार आहे त्याहीपेक्षा अधिक रोषणाई, आतिषबाजी, ढोल ताशे वाजवून अमळनेरकर आनंद व्यक्त करणार आहेत. डॉक्टर, क्रीडा शिक्षक, खेळाडू, अधिकारी आणि सर्वच स्तरातील नागरिक अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व क्रिकेट प्रेमींनी मोठ्या डिजिटल स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी महाराणा प्रताप चौकातील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या प्रांगणात जमावे आणि क्रिकेटच्या जल्लोषात सामील होण्याचे आवाहन ग्रीन ग्रुप, आयएमए संघटना आणि पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
Related Stories
December 22, 2024