रा.काँ. शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केले पुरावे…
अमळनेर:- नानासाहेब कृषी संजीवनी (पोखरा) योजनेंतर्गत शेडनेट मध्ये अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हेच सक्रीय असल्याचा व आणखी दुसऱ्या भ्रष्टाचाराचा पुरावा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. धुळे पोलिसात व आर्थिक गुन्हे शाखेकडे अशोक पाटील यांच्याविरुद्ध दाखल तक्रारी व जबाबाच्या प्रती त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केल्या.
अमळनेर तालुक्यात शेडनेट ओम ऍग्रो सर्व्हिसेसचे संचालक उद्धव सर्जेराव कुवर (रा सोनेवाडी) यांनी बनवले असून त्यात अपूर्णता व भ्रष्टाचार झाल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले होते. त्यांनतर सचिन पाटील यांनी पाठपुरावा केला असता उद्धव कुवर यांनी स्वतः धुळे पोलीस अधिक्षकांकडे अशोक आधार पाटील यांनी सोबत शेडनेट मध्ये काम करताना २०१९ ते २०२१ या कालावधीत १ कोटी ३५ लाख २० हजार रुपयात फसवणूक केल्याची तक्रार केली आहे असे सांगितले. तर दुसरा पुरावा सादर करताना सचिन पाटील यांनी सांगितले की, नरेश मधुकर बागल (रा देवपूर धुळे) या शिक्षकाला एक एकर शेतात पॉलिहाऊस करण्यासाठी अशोक पाटील यांनी ४५ लाख रुपये लागतील व तुम्हाला बँकेतून कर्ज काढून देतो म्हणून कागदपत्रे मागून घेतली. मात्र बँकेचे कुठलेही अधिकारी प्रत्यक्ष शेतात पाहणीला आले नाही तरी मला ३८ लाख रुपये कर्ज युनियन बँकेचे मंजूर झाल्याने मला शंका आली. आणि त्या कर्जाची रक्कम अशोक पाटील व धुळे येथील गल्ली नंबर ५ मधील बँकेचे तत्कालीन मॅनेजर यांनी परस्पर नंदराज देवरे, तिरुपती इरिगेशन खडकी ता. मालेगाव यांच्या नावावर ट्रान्सफर केली. याबाबत धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर तडजोड झाल्याने अशोक पाटील व नंदराज देवरे यांनी संमती करार करून नरेश बागल यांच्या नावे बंधन बँकेचा १४ लाखाचा डीडी दिला. या कागदपत्रांवरून अशोक आधार पाटील हेच शेडनेट घोटाळ्यात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच अशोक पाटील यांनी माझा काही एक संबंध नसल्याचा खुलासा केला होता. मात्र अनोरे येथील अंबु नाना पाटील या शेतकऱ्याने अशोक आधार पाटील यांनी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करून मदत केली. शेडनेट बसवल्याने माझा फायदा झाला भ्रष्टाचारात त्यांचा दोष नाही, असे जाहीर व्हिडिओत सांगितल्याने अशोक पाटील यांच्या सहभागाचा पुरावाच दिला असल्याचेही सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेडनेटची पारदर्शी चौकशी व पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि शासनाच्या पैश्याचा अपहार थांबवावा अशी मागणीही त्यांनी केली.
प्रतिक्रिया…
ओम ऍग्रोच्या संचालक उद्धव कुवर यांच्याकडून पैसे उसनवार घेतले होते आणि ते खात्यावर परत केले आहेत. तर नरेश बागल यांचे पॉलीहाऊस हे कोणत्याही शासकीय अनुदानातून नाही. त्यांच्या शेडनेटच्या नुकसानीचा मोबदला त्यांना देण्यात आल्याने त्यांनी कुठलीही तक्रार नसल्याचा लेखी जबाब दिल्याने अनुदान लाटल्याचा अथवा भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही.
– अशोक आधार पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर
Related Stories
December 22, 2024