अमळनेर:- तालुक्यातील शिरूड येथील ग्रामपंचायत मालकीच्या क्रीडांगणासाठी राखीव जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी संविधान दिनापासून उपोषण सुरू केले होते.मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर युवकांनी उपोषण स्थगित केले.
तालुक्यातील शिरुड येथील ग्रामपंचायत मालकीच्या गट क्र.५ मधील काही जागा युवकांसाठी क्रीडांगण म्हणून राखीव ठेवली होती.तसा ठराव ग्रामपंचायतीने युवकांना दिला होता.मात्र राखीव असलेल्या जागेवर नागरिकांनी रहिवास केला होता.तर काही ग्रामस्थांनी गुरे,म्हशी पाळल्या होत्या तर चारा व इतर शेती उपोयोगी साहित्य ठेवण्यासाठी शेड तयार करण्यात आले होते. गावातील युवकांना व्यायाम करतांना त्याची मोठी अडचण निर्माण होत असल्याने युवक रस्त्यावर व्यायाम करीत होते.मात्र त्याठिकाणी वाहनांचा वापर जास्त असल्याने अपघात होण्याची शक्यता होती.म्हणून युवकांनी ८ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत,पंचायत समिती, पोलीस स्टेशन, जि.प कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देत २६ नोव्हेंबर संविधान दिनापासून उपोषणाचा इशारा देवून ८१ तरुण ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. यावर २० जानेवारी पर्यंत क्रीडांगणावरील सर्व अतिक्रमण काढण्यात येईल. दिलेल्या मुदतीत अतिक्रमण न निघाल्यास आपण सनदशीर मार्गाचा अवलंब करावा, असे लेखी आश्वासन ग्राम पंचायतीने युवकांना दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत देवून उपोषण सोडविण्यात आले.
Related Stories
December 22, 2024