अमळनेर तालुक्यातील ४० शाळांना मिळाले अत्याधुनिक संगणक संच…
अमळनेर:- नाशिक विभागीय शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या विकास निधीतून अमळनेर तालुक्यातील ४० शाळांना संगणक संच देण्यात आले.
खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते शाळांना अत्याधुनिक संगणक संच भेट देण्यात आले.यावेळी माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, खा.शि. मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, माध्यमिक पतपेढीचे संचालक तुषार पाटील, जय योगेश्वर शिक्षण संस्थेचे के.डी. पाटील, साने गुरुजी पतपेढीच्या संचालिका वसुंधरा लांडगे, जि.एस.हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस.डी देशमुख, संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव पाटील, एस.एन. पाटील,मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष एम.ए. पाटील, द्रौ.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार किशोर दराडे यांनी मागील साडे पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.याआधी तालुक्यातील शाळांना आमदार दराडे यांच्या निधीतून प्रिंटर तसेच पुस्तक संच भेट देण्यात आलेले होते. जुनी पेंशन योजना कार्यान्वित व्हावी यासाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांना देण्यात आलेली शाळाबाह्य कामे त्वरित बंद करण्यात यावी,जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावेत, वेतन पथकाकडे प्रलंबित असलेली बिले या व अशा अनेक प्रश्नांना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थितांना दिले.यावेळी संभाजी पाटील,जयवंतराव पाटील, तुषार पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुशील भदाणे यांनी केले तर आभार आर.जे.पाटील यांनी मानले.