सभेजवळील वाहतुकीचे मार्ग बंद करून इतरत्र वळवणार, ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था…
अमळनेर:- येथील सानेगुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात सकल मराठा समाजातर्फे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेसाठी ३ रोजी पोलिसांनी दुपारी ३ वाजेपासून सभेजवळील वाहतुकीचे मार्ग बंद करून ते इतरत्र वळवले आहेत व विशेष पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस व मराठा समाजातर्फे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
जरांगे पाटील यांच्या सभेस प्रचंड गर्दी होणार असल्याने सभा सुरळीत पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी वाहतुकीची कोंडी रोखली जावी. नागरिकांना पार्किंग व्यवस्थेची माहिती देण्यासाठी मराठा मंगल कार्यालयात पोलीस प्रशासन व मराठा समाज यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी वाहतुकीची रूपरेषा सांगितली.
अशी वळवली जाईल वाहतूक…
महाराणा प्रताप चौक व बहुगुणे हॉस्पिटल जवळील अण्णाभाऊ साठे चौक येथेच दुचाकी थांबविण्यात येतील यादरम्यान नो व्हेईकल झोन राहील. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असेल,धुळे कडून येणारी अवजड वाहने अमळनेर कडे न येता फागण्याजवळील पारोळा चौफुलीवरून पारोळाकडे वळविण्यात येतील. चोपडा व पारोळा कडून येणाऱ्या अवजड वाहनांना देखील अमळनेरऐवजी पर्यायी मार्गाने जावे लागेल, प्रांतअधिकारी महादेव खेडकर यांनी तसे लेखी आदेश काढले आहेत. सभेचे नियम आयोजकांनी पाळावे,एसटी बसला अमळनेरात प्रवेश असेल मात्र पर्यायी मार्ग अवलंब करावा लागेल.
असा असेल बंदोबस्त…
गोपनीय शाखेचे शरद पाटील यांनी माहिती देताना सभास्थळी मुख्य इमारतीला सीसीटीव्ही कॅमेरे, वॉचर राहणार असून मंचाजवळ कोअर कमिटीलाच प्रवेश राहील,प्रत्येक गेटवर वेगवेगळे नियोजन असेल,काही ठिकाणी नो व्हेहिकल झोन असेल, फक्त २० वाहनांसाठी व्हीआयपी पार्किंग सानेगुरुजी शाळेशेजारी योगा भुवन च्या जागेत असेल,पार्किंग साठी खड्डजिन रिझर्व्ह असेल,बंदोबस्त साठी १ डीवायएसपी,४ पालिस निरीक्षक,१४ एपीआय व पीएसआय आणि १२३ पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशी असेल पार्किंगची सोय…
चोपडा, पारोळा, व धरणगाव रोड करून येणाऱ्यांची पार्किंग व्यवस्था विश्रामगृह व स्वामी समर्थ मंदिरामागे मोकळी जागेत व कचेरी जवळ करण्यात आली आहे.धुळे रोड करून येणाऱ्या साठी पार्किंग व्यवस्था मार्केट कमिटी, सरजू शेठ यांची कॉम्प्लेक्स येथील जागा येथे असेल.मारवड गलवाडे कडून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था प्रमुख पेट्रोल पंपाजवळ, ग्लोबल शाळेजवळ करण्यात आली आहे. ढेकु रोड, पिंपळे रोडकडून येणाऱ्या साठी पार्किंग व्यवस्था नाट्यगृहासमोर करण्यात आली आहे. नंदगाव, तांबेपुरा कडून येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था खड्डाजीन इथे करण्यात आली आहे. या सभेसाठी येणाऱ्यांना वाहन पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावे लागेल. तसेच, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे लागेल अशी माहिती पोलिसांनी दिली.
जरांगे पाटील यांचे आगमन झाल्यानंतर सुरवातीला त्यांचे स्वागत व औक्षण होऊन लागलीच सभेला सुरुवात होणार आहे, ४० मिनिटे त्यांचे भाषण होऊन त्यानंतर लागलीच चोपड्याकडे ते रवाना होणार आहेत.
पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, मनोहरराव निकम,गुड्डू देशमुख, संजय पुनाजी पाटील यांनीही माहिती दिली, सूत्रसंचालन विक्रांत पाटील व आभार संजय पाटील यांनी मानले. यावेळी राजेंद्र देशमुख, जयंत पाटील, हर्षल पाटील, प्रवीण देशमुख, जयेश पाटील, बाबू साळुंखे आदी उपस्थित होते.