जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना निवेदन देत केली मागणी…
अमळनेर:- शेडनेट गैरव्यवहार प्रकरणात अशोक आधार पाटील, त्यांचा शालक समाधान दिगंबर शेलार, शेडनेट उभारणी करणाऱ्या कंपन्यांचे मालक,कृषी खात्याचे काही अधिकारी,बँक कर्मचारी व इतर सहभागी असलेले लोक यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रा.कॉ शरद पवार गट, उबाठा शिवसेना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदन देत केली.
शेडनेट घोटाळा अमळनेरसह जळगांव धुळे,नंदुरबार, अहमदनगर, नाशिक, जालना, बीड व इतर जिल्ह्यात याची व्याप्ती आहे तसेच हा घोटाळा 100 कोटी रु पेक्षा जास्त आहे याची माहिती सांगत हे सर्व करून दलाल व यासंबंधित ठेकेदारांनी शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून मृत्यूच्या दाराशी कसे आणून ठेवले ? शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक कशी झाली ? या बाबत सविस्तरपणे माहिती व तक्रार देत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी केली. तसेच पोलीस अधीक्षक यांनी पारदर्शक चौकशी करू व दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले. यावेळी सचिन बाळू पाटील यांच्यासह उबाठा उपशहर प्रमुख अनंत निकम, राष्ट्रवादीचे सचिन वाघ, शेतकरी कैलास पाटील, दिनेश पाटील, नारायण पाटील, ईश्वर पाटील, उमाकांत पाटील आदी उपस्थित होते.