जळगाव जिल्ह्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर अमळनेर शहरात प्रयोग सुरू…
अमळनेर:- शहरातील प्राथमिक शाळांसाठी आता शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता सेंट्रल किचन पद्धतीने मधल्या सुटीत पार्सल ने देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग अमळनेर येथे सुरू करण्यात आला आहे.
कुपोषित व गरीब बालकांना शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी आणि बालकांचे सर्व प्रकारे योग्य पोषण होण्यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना काढली आहे. सर्वसाधारणपणे प्राथमिक शाळेत शिपाई पद नसल्याने शिक्षकांनाच पोषण आहार बनवण्यासाठी इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागत होती. त्यामुळे शिक्षकांचा वेळ जाऊन अध्यापनाकडे दुर्लक्ष होत होते. परंतु आता सेंट्रल किचन पद्धत सुरू करण्यात आल्याने शिक्षकांचा बराचसा ताण कमी होऊन अध्यापन सुधारण्यास मदत होणार आहे.
काही शाळांमध्ये एकाच प्रकारची खिचडीचे जेवण दिले जात असे पूरक आहार दिला जायचा नाही आणि शाळेकडे व्यवस्था असल्याने पालक तक्रार करण्यास धजावत नव्हते. काही शाळांमधून तांदूळ साचून परस्पर विक्री केला जात असे. आता सेंट्रल किचन पद्धतीमुळे बऱ्याच प्रमाणात सुधारणा होऊन विविध मेन्यू आणि पूरक आहार देखील मिळणारच आहे.
अमळनेर शहरातील ४३ शाळांसाठी प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. १ ली ते ५ वी साठी ६०७६ विद्यार्थी असून त्यांच्या साठी ४०० ते ४५० उष्मांक व १२ ग्राम प्रथिने असलेले मध्यान्ह भोजन तर ६ वि ते ८ वि चे ५ हजार ४८६ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी ७०० ते ७५० उष्मांक असलेले आणि २० ग्राम प्रथिनयुक्त भोजन आवश्यक आहे.