मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने मिळाली प्रशासकीय मान्यता…
अमळनेर:- तालुक्यातील क्रीडा संकुल आणि चोपडाई ग्रामपंचायतीसाठी ओपन जिमला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी तरुणांना व्यायामाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी क्रीडा संकुलाच्या नूतनीकरण आणि नवीन मैदानासोबत तरुण खेळाडू आणि नागरिकांना व्यायामाची सुविधा क्रीडा संकुलात उपलब्ध व्हावी, म्हणून प्रत्येकी ४ लाख रुपयांची ओपन जिमचा प्रस्ताव पाठवला होता. ग्रामीण भागात देखील चोपडाई ग्रामपंचायती साठी ओपन जिमला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तंत्रशुद्ध व्यायाम आणि पोलीस भरतीसाठी तरुणांना व्यायामाची साधने उपलब्ध होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा आणि तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे. यासह पारोळा आणि धरणगाव क्रीडा संकुलात देखील ओपन जिम आणि भऊर ता. चाळीसगाव, हतनूर ता. भुसावळ या ग्रामपंचायतीसाठी देखील ओपन जिमला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ओपन जिम उभारल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती करण्याबाबत ग्रामपंचायत आणि क्रीडा संकुल जबाबदारी घेण्याचे प्रतिज्ञापत्र करून दिल्यावरच कामाला सुरुवात होणार आहे. क्रीडा संकुलाला दोन कोटींचा निधी प्राप्त झाल्यानंतर लागलीच ओपन जिम मंजूर झाल्याने क्रीडा प्रेमींना आनंद झाला आहे. खेळाडू व क्रीडा शिक्षकांसह नागरिकांनी मंत्री अनिल पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी नाईक व तालुका क्रीडाधिकारी चौधरी यांचे आभार मानले आहेत.